भारतीय पंच अनिल चौधरी यांनी शनिवारी पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या यष्टीरक्षणाबाबत एक मजेशीर खुलासा केला. त्याच्यामुळे मला अंपायरिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असं ते म्हणाले.
वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग करणाऱ्या अनिल चौधरी यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, मोहम्मद रिझवानच्या सामन्यादरम्यान वारंवार अपील करण्याच्या सवयीमुळे ते त्याच्या अपीलकडे दुर्लक्ष करू लागले होते. त्यांनी त्यांच्या सहकारी अंपायरला देखील याबाबत सांगितलं होतं आणि रिझवानच्या या वागण्यापासून सावध राहण्यास सांगितलं.
यूट्यूब शो ‘2 स्लॉगर्स’ मधील संभाषणादरम्यान अनिल चौधरी यांना विचारण्यात आलं की, त्यांनी कधी रिजवान खेळत असलेल्या सामन्यात अंपायरिंग केलं आहे का? यावर त्यांनी आशिया चषकातील एका सामन्याची आठवण काढली. ते म्हणाले की, पंच सामन्यादरम्यान होणाऱ्या अपीलच्या आधारे चांगल्या आणि वाईट यष्टीरक्षकांमधील फरक ओळखतात.
अनिल चौधरी म्हणाले, “तो (रिझवान) खूप अपील करतो. मी माझ्या सहकारी पंचांनाही सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तो प्रत्येक चेंडूवर ओरडतो. एकदा वेळ अशी आली होती की, एक अंपायर त्याचं अपील मान्य करणार होते, मात्र त्यांना माझं बोलणं आठवलं आणि त्यांनी आऊट देण्यास नकार दिला. तो नंतर नॉट आउट निघाला. तो कबुतरासारखा उड्या मारत राहतो. आता तर उत्तम टेक्नॉलॉजी आली आहे. तुम्ही स्वत:चा अपमान का करून घेता. चुकीचं निघालं तर लोक तुमचीच चेष्टा करतील.”
हेही वाचा –
सूर्यकुमार यादवला आयपीएलच्या या मोठ्या संघाकडून कर्णधारपदाची ऑफर! मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का?
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ स्टार खेळाडूनं झळकावलं शानदार शतक