---Advertisement---

रिझवानच्या हिमतीला भारतीय डॉक्टरांची साथ; शर्थीचे प्रयत्न करत केले यशस्वी उपचार

On: शनिवार, नोव्हेंबर 13, 2021 8:44 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ५२ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली. पण, या सामन्याच्या काही तास आधीपर्यंत तो आयसीयूमध्ये दाखल होता, असा खुलासा त्याच्याच संघाचे फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन यांनी केला होता. त्याचबरोबर रिझवानच्या उपचारात एका भारतीय डॉक्टरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही समोर येत आहे.

एका वृत्तानुसार, रिझवानवर दुबईतील मेडॉर हॉस्पिटलमध्ये भारतीय वंशाचे डॉक्टर साहीर सनलाब्दीन यांनी उपचार केले. रिझवान ज्या पद्धतीने बरा होऊन मैदानावर पोहोचला आणि आपल्या संघासाठी शानदार खेळ दाखवला, ते पाहून खुद्द डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी सांगितले की, उपचारादरम्यान रिझवान सतत एकच सांगत होता की, मला खेळायचे आहे आणि मला संघासोबत राहायचे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ५२ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी खेळण्यापूर्वी त्याला जवळपास ३५ तास आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्याने यशस्वीपणे छातीच्या संसर्गाविरुद्ध लढा दिला होता.

डॉक्टरांनी सांगितले की, ‘९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता रिझवानला ताप, सततच्या खोकल्यामुळे छातीत त्रास आणि हृदयदुखीमुळे रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याला त्याचे दुखणे असह्य होत होते आणि चाचणीनंतर त्याला फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. जे दुरुस्त होण्यासाठी साधारणपणे ५ ते ७ दिवस लागतात. डॉक्टरांनी सांगितले की, सततच्या वेदना आणि त्रासामुळे त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. तो जवळपास ३५ तास आयसीयूमध्ये होता पण त्याचा आत्मविश्वास खूप चांगला आहे. त्याच्या मनात फक्त उपांत्य फेरीचा सामन्याचा विचार होता. या महत्त्वाच्या सामन्यात त्याला काहीही करून खेळायचे होते. तो ज्या गतीने सावरला आहे ते पाहून मलाही आश्चर्य वाटते.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---