रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. हे दोन्ही संघ जेव्हा समोरासमोर येत असतात, त्यावेळी चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळत असतो. परंतु यावेळी भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच मोहम्मद शमीला या पराभवाचे कारण ठरवले जात आहे. सोशल मीडियावर त्याच्या विरुद्ध अपशब्दांचा देखील वापर केला जातोय. अशातच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला पाठिंबा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद शमी सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता.त्याने ३.५ षटकात ४३ धावा खर्च केल्या होत्या. ज्यामुळे चाहत्यांनी त्याला धर्मावरून आणि प्रदर्शनावरून टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मोहम्मद शमी पाकिस्तानी प्रेक्षकाला भिडताना दिसून येत आहे.
त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यातील आहे. ज्यावेळी पाकिस्तान संघाने भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत, चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. त्यावेळी भारतीय संघातील खेळाडू जेव्हा ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाकिस्तानचे काही प्रेक्षक भारतीय खेळाडूंना पाहून, ‘बाप कौन है..’ असे म्हणत होते,त्यावेळी एकटा मोहम्मद शमी प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन त्याला नडला होता. परंतु त्याच मोहम्मद शमीला एका सामन्यात केलेल्या खराब कामगिरीमुळे देशद्रोही असे म्हटले जात आहे.
हा मोहम्मद शामी आहे ज्यानं परवाचा सामना संपल्यावर "बाप कौन है, बाप कौन है" असा प्रश्न विचारत संपूर्ण भारतीय संघाला हिणवणाऱ्या दर्शकाला भिडायचं डेरिंग केलं.
बाप कौन है ऐकल्यावर एकटाच त्या दर्शकाला त्याचा बाप दाखवायला माघारी फिरला होता#WellDone #MohammadShami pic.twitter.com/vjjAImbDqs— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 26, 2021
तसेच भारत – पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर, भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती. रिषभ पंतने ३९ आणि रवींद्र जडेजाने १३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाला २० षटकाअखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ७९ आणि बाबर आजमने ६८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला.