आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी सर्वात आनंद देणारा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे हॅट्रिक मिळवणे. आंतरराष्ट्रीय सामन्यांत फलंदाज सातत्याने शतके काढू शकतात अथवा गोलंदाज बळींचे पंचक घेऊ शकतात. मात्र, हॅट्रिक मिळवण्यासाठी भरपूर कौशल्य आणि नशीब या दोन्हींची गरज असते. अगदी तुरळक वेळीच गोलंदाज हॅट्रिक घेताना दिसतात. ही अशी काहीशी दुर्मिळ असणारी गोष्ट जर विश्वचषकात घडली तर, गोलंदाजांच्या आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावर ऊरत नाही. बरोबर तीन वर्षांपूर्वी म्हणजे २२ जून २०१९ रोजी भारताच्या एका गोलंदाजाने अशीच विश्वचषकात हॅट्रिक मिळवली होती. हा गोलंदाज म्हणजे भारताचा सध्याचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी होय.
अफगाणिस्तानने झुंजवले भारताला
इंग्लंडमध्ये आयोजित २०१९ वनडे विश्वचषकात भारतीय संघाने आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांना पराभूत केले होते. तर, न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर पाचव्या सामन्यात भारताची गाठ अफगाणिस्तानविरुद्ध पडली.
भारताच्या तुलनेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना केवळ २२४ धावांमध्ये रोखले. भारतासाठी कर्णधार विराट कोहली व केदार जाधव यांनी अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही व नियमित अंतराने बळी मिळवले. अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी याने एक बाजू लावून धरत अफगाणिस्तानला विजयाच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न केले.
शमीची ऐतिहासिक हॅट्रिक
अफगानिस्तान संघाला अखेरच्या षटकात जिंकण्यासाठी १६ धावांची आवश्यकता होती. त्यांचे तीन गडी बाद होणे शिल्लक होते. हे महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी भारताकडून मोहम्मद शमी याला पाचारण केले गेले. चांगल्या स्थिरावलेल्या मोहम्मद नबीने पहिल्या चेंडूवर चौकार मारत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर होणार का? अशी भारतीय चाहत्यांना भीती वाटू लागली.
मात्र, शमीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत पुढील चेंडू स्लोअर वन टाकला व नबीने हा चेंडू षटकार मारण्याच्या नादात लॉंग ऑनला उभ्या असलेल्या हार्दिक पंड्याच्या हाती सोपा झेल दिला. पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आफताब आलम मैदानावर आला. शमीचा इनस्विंग त्याला समजू शकला नाही व तो त्रिफळाचित झाला. शमीकडे स्वतःची हॅट्रिक पूर्ण करण्याची तसेच, संघाला विजय मिळवून देण्याची सुवर्णसंधी चालून आली. अफगाणिस्तानचा अखेरचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या मुजीब उर रहमान याला शमीने १४२ किमी प्रतितास वेगाचा यॉर्कर मारत, आपली हॅट्रिक पूर्ण केली. तसेच, भारतीय संघाने चौथा विजय मिळवत विश्वचषकाच्या गुणतालिकेतील आपले पहिले स्थान अबाधित ठेवले.
But it was India's pace duo that had the last laugh with @Jaspritbumrah93 adjudged Player of the Match and @MdShami11 taking a hat-trick to seal victory.
See all of the wickets here ????#TeamIndia | #CWC19 pic.twitter.com/MAlVGTmUlC
— ICC (@ICC) June 22, 2019
विश्वचषकात हॅट्रीक घेणारा दुसरा गोलंदाज
मोहम्मद शमी या हॅट्रिकसह विश्वचषकात भारतासाठी हॅट्रिक घेणारा केवळ दुसराच फलंदाज बनला. भारतासाठी विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेण्याचा मान चेतन शर्मा यांच्याकडे जातो. त्यांनी १९८७ विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर पुढील हॅट्रिकसाठी भारतीय चाहत्यांना ३२ वर्ष व ७ विश्वचषक वाट पाहावी लागली.
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्याच दिवशी टीम इंडियाने खेळला होता विश्वचषकाचा ‘तो’ अजरामर सामना, संपूर्ण देशाला आलं होतं गहिवरुन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० वर्षानंतर प्रथमच श्रीलंका संघाने रचला ‘हा’ इतिहास