मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या प्रतिभेवर क्वचितच कोण संशय घेतं असेल. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वनडेत सचिनच्या नावावर सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. शिवाय त्याने वनडेत १८४२६ धावांही केल्या आहेत.
परंतु, सचिनने एवढे यश तेव्हा मिळवले जेव्हा त्याला सलामीला फलंदाजी करायची संधी मिळाली. सचिनने डिसेंबर १९८९मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. त्यानंतर पुढे ४ वर्षांत तो फक्त ४ शतके करु शकला होता. परंतु, पुढे सचिनला १९९४मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सलामीला फलंदाजी करायची संधी मिळाली आणि सचिनने संधीचे सोने करत संघातील आपले सलामीचे स्थान पक्के केले.
सचिनच्या संघातील पहिल्या स्थानाची इतकी दहशत झाली होती की, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला सचिनला सलामीच्या स्थानावर टिकवून ठेवण्यासाठी बीसीसीआयचे बोलणे ऐकावे लागले होते.
अझरुद्दीनने एका खेळाच्या वेबसाइटसोबत फेसबुक लाइव्हवर बोलताना या गोष्टीचा उलगडा केला होता. अझरुद्दीन म्हणाला की, “ही घटना १९९८मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यावेळी झाली होती. त्यावेळी भारतीय संघ निवडकर्त्यांना भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजाच्या स्थानासाठी नवा प्रयोग करायचा होता. त्यांनी मला सांगितले होते की, यावेळी सचिनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठव.”
“म्हणून मी सचिनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. त्या सामन्यात सचिनने जवळपास ५४ धावा केल्या होत्या. मग मला वाटले की, सचिन सलामीलाच जास्त चांगली कामगिरी करेल. म्हणून पुढील सामन्यापासून मी त्याला सलामीला संधी दिली होती. दौरा संपल्यानंतर जेव्हा आम्ही भारतात परत गेलोत, तेव्हा बीसीसीआयने माझ्या या वागणूकीसाठी मला खूप सुनावले होते.”
शिवाय, बोलताना अझरुद्दीनने सचिनला सर्वप्रथम सलामीला पाठवण्यात आलेल्या सामन्याच्या काही आठवणी सांगितल्या. “न्यूजीलंड दौऱ्यावर असताना नवज्योत सिंग सिद्धूला दुखापत झाली होती. त्यामुळे मी सचिनला सलामीला पाठवायचे ठरवले होते. संघ व्यवस्थापक अजित वाडेकर यांनीही माझ्या निर्णयाला सहमती दिली होती. आमच्या या निर्णयाचा पुढे भारतीय संघाला खूप फायदा झाला. सचिनला जेव्हा ही बातमी देण्यात आली, तेव्हा तो खूप आनंदी झाला होता,” असे पुढे बोलताना अझरुद्दीन म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
टक्कल असलेल्या क्रिकेटपटूंची ‘ऑल टाईम ११ टेस्ट टीम’, पहा…
धोनीने वाचवला पक्ष्याचा जीव; मुलगी झिवाने शेअर केले फोटो
क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३४ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा…