नवी दिल्ली । भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार एमएस धोनी मागील ११ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. परंतु असे असले तरी तो चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवारी (९ जून) धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीची मुलगी झिवा धोनीने चाहत्यांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले, की कशाप्रकारे तिच्या आई- वडिलांनी म्हणजेच धोनी आणि साक्षीने एका पक्ष्याचा जीव वाचवला.
झिवाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये धोनीच्या हातात एक पक्षी बसला आहे. झिवाच्या पोस्टनुसार, तो पक्षी बेशुद्ध अवस्थेत होता. परंतु त्यानंतर धोनीने (MS Dhoni) पाणी पाजून त्याचा जीव वाचवला.
झिवाच्या (Ziva Dhoni) अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आज आमच्या अंगणात (लॉन) एक पक्षी बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यावेळी मी माझ्या आई-वडिलांना बोलावले. वडिलांनी त्या पक्ष्याला हातात घेतले आणि त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्या पक्ष्याने डोळे उघडले. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही त्या पक्ष्याला एका लहानश्या टोपलीत पानांवर ठेवले.”
“आईने सांगितले, की हा तांबट पक्षी आहे. ज्याला कॉपर स्मिथदेखील म्हटले जाते. किती सुंदर पक्षी आहे. यानंतर तो अचानक उडून गेला. मला तो स्वत: पाशी ठेवायचा होता. परंतु आईने सांगितले, की तो पक्षी आपल्या आईकडे गेला आहे. मला खात्री आहे, की मी त्याला पुन्हा पाहू शकेल,” असेही त्या कॅप्शनमध्ये पुढे लिहिले होते.
लॉकडाऊनमध्येही धोनी ठरतोय चर्चेचा विषय
सध्या संपूर्ण क्रिकेट ठप्प झाले आहे. परंतु धोनी नेहमी चर्चेत असताना दिसतोय. लॉकडाऊनदरम्यान धोनीच्या लूकपासून ते त्याच्या बाईक रायडिंगपर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्याने नुकताच एक नवीन ट्रॅक्टर विकत घेतला आहे. असे म्हटले जात आहे, की रांची येथील आपल्या फार्महाऊसमध्ये धोनी शेती करणार आहे.