भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन केलं आहे. शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळतोय. स्पर्धेत मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्यानं चेंडूसह बॅटनं देखील आपली ताकद दाखवली. बंगालच्या संघानं हा सामना 11 धावांनी जिंकला, ज्यामध्ये शमीचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. शमीचं लयीत येणं, ही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे.
मोहम्मद शमीनं नोव्हेंबर 2023 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, जो एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होता. या स्पर्धेनंतर शमीच्या घोट्याला दुखापत झाल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं. या वर्षी फेब्रुवारीमध्ये घोट्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर शमी काही काळ बेड रेस्टवर होता. यानंतर त्यानं आपला फिटनेस पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये कठोर परिश्रम केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत शमी संघात पुनरागमन करेल, असं मानलं जात होतं. परंतु ते शक्य झालं नाही. टीम इंडियात परतण्यापूर्वी शमीनं रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शमीला पहिल्या डावात 4 विकेट घेण्यात यश मिळालं.त्यानं 19 षटके टाकली आणि 54 धावा दिल्या.
यानंतर बंगालच्या दुसऱ्या डावात शमीनं फलंदाजीत आपले हात उघडले आणि 36 चेंडूंत 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकारांचाही समावेश होता. मध्य प्रदेशच्या दुसऱ्या डावात शमीनं चेंडूनं पुन्हा चमकदार कामगिरी करत 3 बळी घेतले. त्यानं 24.02 षटकं गोलंदाजी करत 102 धावा दिल्या.
बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी जाहीर भारतीय संघात मोहम्मद शमीचा समावेश नाही. मात्र तरीही तो या मालिकेत सहभागी होऊ शकतो, अशी आशा आहे. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत दुखापतीमुळे कोणताही खेळाडू बाहेर पडला, तर शमी त्याची जागा घेऊ शकतो.
हेही वाचा –
दणदणीत मालिका विजयानंतर मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले…
भारतीय संघ अडचणीत! पहिल्या कसोटीपूर्वी आणखी एक मोठा फलंदाज जखमी
“पुढचा धोनी कोण हे आधीच सांगितलं होतं..”, संजूच्या शतकानंतर शशी थरूर यांची 15 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल