युवा फलंदाज नितीश रेड्डीनं मेलबर्न कसोटीत दमदार कामगिरी करत कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या शतकानंतर सगळीकडे नितीशचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचं खूप कौतुक चालू आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का की, नितीश कुमार रेड्डीच्या शतकामागे मोहम्मद सिराजची महत्त्वाची भूमिका आहे! हे फारच कमी लोकांना माहीत असेल.
टीम इंडियासाठी नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यानं वॉशिंग्टन सुंदरसोबत दमदार भागीदारी केली. सुंदर 50 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराह फलंदाजीला आला. पण तोही शून्यावर बाद झाला. यावेळी नितीशचं शतक अवघड वाटत होतं. पण शेवटी मोहम्मद सिराजनं नितीश 99 धावांवर खेळत असताना चमत्कार केला.
वास्तविक, पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी डावातील 114वं षटक टाकत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं बुमराहला बाद केलं. यानंतर सिराज फलंदाजीला आला. सिराजनं षटकातील चौथा, पाचवा आणि सहावा चेंडू अतिशय आरामात खेळला. या काळात त्यानं आपली विकेट पडू दिली नाही. ओव्हर संपल्यानंतर स्ट्राईक नितीशकडे आली. येथे जर सिराज बाद झाला असता, तर नितीशला शतक झळकावता आलं नसतं. पुढच्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नितीशनं चौकार मारून आपलं शतक पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं 358 धावा केल्या आहेत. यादरम्यान रेड्डीनं नाबाद 105 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकार मारला. नितीश रेड्डीच्या शतकामुळे टीम इंडिया आता मजबूत स्थितीत आली आहे. मात्र संघ अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 116 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियानं आपल्या पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
मूर्खपणा, मूर्खपणा, मूर्खपणा!….या भारतीय खेळाडूवर भडकले सुनील गावस्कर; ड्रेसिंग रुममधून बाहेर करण्याची मागणी
ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय, दिग्गजांच्या लिस्टमध्ये नितीश रेड्डीचाही समावेश
WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताच्या आशा जिवंत, जाणून घ्या समीकरण