भारत व इंग्लंड यांच्यादरम्यान पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेला रंग चढायला सुरुवात झाली आहे. आजी-माजी खेळाडू या मालिकेविषयी चर्चा करत चांगलीच वातावरणनिर्मिती करत आहेत. इंग्लंड संघाचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर यानेही या बहुप्रतिक्षित मालिकेविषयी मते मांडली आहेत. आगामी मालिकेत रविचंद्रन अश्विनविरूद्ध इंग्लंडचे फलंदाज कशी फलंदाजी करतात?, यावर मालिकेचे भवितव्य अवलंबून असल्याचे पानेसरने म्हटले आहे.
पुढील महिन्यात सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
सन २०२१ या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होईल. भारतीय संघ जवळपास वर्षभराचा कालावधीनंतर मायदेशात कसोटी मालिका खेळेल. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या ‘हाय वोल्टेज’ मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने जाणकार तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
इंग्लंड संघाचा आत्मविश्वास दुणावेल- पानेसर
इंग्लंडच्या सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक राहिलेल्या पानेसरने भारतातील आघाडीच्या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “इंग्लंडचा संघ चेन्नईत एक सामना जिंकला तरी त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. मला आशा आहे की, इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर चांगली कामगिरी करेल. इंग्लंडचे दोन्ही अनुभवहीन फिरकीपटू डॉम बेस व जॅक लिच यांना कोणताही दबाव न घेता खेळ दाखवावा लागेल. त्यासाठी सातत्याने, हुशारीने क्षेत्ररक्षणात बदल करावे लागतील. जोखीम पत्करल्यानंतरच बळी मिळवता येतात.”
अश्विनच्या कामगिरीवर असेल नजर- पानेसर
पानेसरने पुढे म्हटले की, “अश्विनसाठी हा दौरा महत्वपूर्ण असेल. ऑस्ट्रेलियात त्याने दमदार कामगिरी केली होती. इंग्लंडचे फलंदाज अश्विनविरुद्ध कशी फलंदाजी करतात?, यावर मालिकेचा निर्णय होऊ शकतो. अश्विन फॉर्ममध्ये असल्यास आणखी धोकादायक होतो. माझ्या मते तो भारतासाठी ‘एक्स-फॅक्टर’ ठरेल.”
पानेसरने भारतात केली होती दमदार कामगिरी
भारतीय वंशाच्या पानेसरने इंग्लंडसाठी ५० कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडने भारतात जिंकलेल्या २०१२ मालिकावेळी चार सामन्यात पानेसरने १७ बळी आपल्या नावे केले होते. सध्या तो समालोचनाचे काम करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या कामगिरीवर इंग्लंडचे माजी कोच फिदा, म्हणाले “भारताला मायदेशात हरवणे कठीण”
स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान