इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतीय संघ मालिकेत आघाडीवर असला तरी इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला चांगलेच त्रस्त केले. दोन्ही सामन्यांमध्ये शतक ठोकताना तो इंग्लंडच्या डावाची जबाबदारी घेताना दिसत आहे. त्याचवेळी, एका माजी इंग्लिश क्रिकेटपटूने रूटला कशाप्रकारे बाद करायचे याबाबत सल्ला दिला.
अशा प्रकारे फसवले जाऊ शकते रूटला
इंग्लंडचा माजी फिरकीपटू व सध्या क्रिकेट समीक्षक म्हणून काम करत असलेल्या मॉन्टी पानेसर याने जो रूटला कशाप्रकारे बाद केले जाऊ शकते, याबाबतची एक युक्ती सांगितली.
पानेसर म्हणाला, “तुम्ही रूटला आखूड टप्प्याचे चेंडू टाकून हैराण करू शकत नाही. तो असे चेंडू उत्तमरीत्या खेळून काढतो. तुम्ही त्याला सलगपणे पाचव्या यष्टीवर गोलंदाजी करायला हवी. त्यामुळे त्याला आपली योजना बदलावी लागेल. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने असेच काहीतरी नियोजन केले होते.”
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे रूट
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेला रूट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नॉटिंघम येथील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर, लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावातही इतर फलंदाज बाद होत असताना त्याने एकहाती किल्ला लढवत नाबाद १८० धावांची खेळी केली. त्याने आत्तापर्यंत मालिकेत दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये १२८.६६ च्या सरासरीने ३८६ धावा केल्या आहेत. नॉटिंघम कसोटीत त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
हेडिंग्ले येथे खेळला जाणार तिसरा सामना
मालिकेतील तिसरा आणि महत्त्वपूर्ण सामना हेडिंग्ले ओव्हलच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेत पिछाडीवर असलेला इंग्लंड संघ या सामन्यात विजयासाठी जिकिरीचे प्रयत्न करेल. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या वरच्या फळीतील काही फलंदाजांना वगळले जाऊ शकते. या सामन्यात देखील संघाची सर्वाधिक जबाबदारी कर्णधार रूटच्या खांद्यावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकातासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात करू शकतो जोरदार पुनरागमन
टी२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात, ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात पत्ता कट






