आयपीएलमध्ये बुधवारी (30 सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात सामना खेळला जात आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात राजस्थान संघाने विजय मिळवला, तर केकेआर संघाला एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज ऑएन मॉर्गन याने मंगळवारी (29 सप्टेंबर) सांगितले की, राजस्थान रॉयल्सच्या वरच्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजांच्या शानदार फॉर्ममुळे त्याचा संघ चिंतेत आहे. राजस्थानचे फलंदाज जोस बटलर, संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
हे खेळाडू टिकलेत तर जिंकू शकत नाही सामना
मॉर्गन म्हणाला, “त्यांच्याकडे उत्तम खेळाडू आहेत आणि आम्हाला त्यांना बाद करावेच लागेल. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला कोणताही फलंदाज 20 षटके टिकला तर आम्ही सामना जिंकू शकत नाही. विशेषत: बटलर आणि सॅमसन.”
राजस्थान संघाने या हंगामात खेळलेल्या दोन्ही सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत. किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी 224 धावांचे लक्ष्य गाठून विक्रम नोंदविला आहे.
खेळावर करावे लागेल लक्ष केंद्रीत
पुढे बोलताना मॉर्गन म्हणाला, “त्यांच्याकडे खूप अनुभवी संघ आहे. आम्हाला आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत करावेच लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल. आशा आहे की आम्ही ते करण्यात यशस्वी होऊ.”