जून 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल झाला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची हेड कोच म्हणून नियुक्ती झाली. त्यानं येताच कोचिंग स्टाफमध्ये आपल्या आवडत्या व्यक्तींचा समावेश करून घेतला. यामध्ये एक नाव दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलचं आहे.
मॉर्केल भारतीय संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला. त्यानं यापूर्वी केकेआरमध्ये गौतम गंभीरसोबत काम केलं होतं. आता 19 सप्टेंबरला सुरु होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून त्याच्या कार्यकाळाचा श्रीगणेशा होईल. मॉर्केल सध्या चेन्नईमध्ये भारतीय संघासोबत प्री सिझन कॅम्पमध्ये आहे.
दरम्यान मोर्ने मॉर्केलचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याची बातमी मिळताच त्याची काय प्रतिक्रिया होती, हे सांगितलं. मॉर्केल म्हणाला की, ही बातमी मिळताच मी सर्वप्रथम माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यानंतर माझ्या पत्नीला याची माहिती दिली. बीसीसीआयनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
मोर्ने मॉर्केल म्हणाला, “जेव्हा मला ही बातमी मिळाली, तेव्हा मी 5 मिनिटं माझ्या खोलीत बसून राहिलो आणि त्यानंतर माझ्या वडिलांना कॉल केला. साधारणत: लोक अशी बातमी सर्वप्रथम आपल्या पत्नीला देतात. मात्र मी तसं केलं नाही. मी सर्वप्रथम माझ्या वडिलांशी बोललो. हा माझ्यासाठी खूप खास क्षण होता. मी जवळपास 5-7 मिनिटे यांचा आनंद घेतला आणि त्यानंतर माझ्या कुटुंबाला याची माहिती दिली. मी खूप आनंदी आहे की सर्वकाही ठीक झालं आणि मी आता येथे आहे.”
मॉर्केल पुढे बोलताना म्हणाला की, “लोकांशी चांगल्या प्रकारे जुळवून घेणं महत्त्वाचं असतं. मी काही खेळाडूंविरुद्ध भरपूर क्रिकेट खेळलो आहे. मी आयपीएल खेळणाऱ्या काही खेळाडूंशीही भेटलो आणि त्यांच्याशी जोडल्या गेलो आहे. नातं बनवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.”
हेही वाचा –
कोण आहे दुलीप ट्रॉफीमध्ये पहिलं शतक झळकावणारा प्रथम सिंह? सुरेश रैनाशी आहे खास नातं
“श्रेयस अय्यर स्वतःला कोहली समजतोय, त्याची पातळी…”, माजी क्रिकेटपटूनं वाभाडे काढले
‘कॅप्टन कूल’ वगैरे सर्व खोटे? सीएसकेच्या माजी खेळाडूने उघडले पडद्यामागचे गुपीत