भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. ०९ जून) दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात भारताने एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या विक्रमात भारताने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांनाही मागे टाकले आहे. काय आहे तो विक्रम चला जाणून घेऊया…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात खेळल्या गेलेल्या या पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २११ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाने उभ्या केलेल्या या धावसंख्येमुळे नवा विक्रम रचला आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये खेळताना सर्वाधिकवेळा २००हून अधिक धावा करणाऱ्या संघामध्ये भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारतीय संघाने तब्बल २० वेळा ही कामगिरी केली आहे. या यादीत भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी १४ वेळा ही कामगिरी केली आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी इंग्लंड संघ असून त्यांनी १३ वेळा २००हून अधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे. त्याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी न्यूझीलंड संघ आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत १२ वेळा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २००हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा २००हून अधिक धावा करणारे संघ
२० वेळा- भारत
१४ वेळा- ऑस्ट्रेलिया
१४ वेळा- दक्षिण आफ्रिका
१३ वेळा- इंग्लंड
१२ वेळा- न्यूझीलंड
सामन्याचा आढावा-
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून खेळताना इशान किशन (Ishan Kishan) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ४८ चेंडूत ७६ धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ११ चौकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने ३६, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद ३१, कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने २९ आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने २३ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज, एन्रीच नॉर्किया, वेन पार्नेल आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दात तुटून रक्तबंबाळ झालेलं फलंदाजाचं तोंड, पाहा एँडरसनने फेकलेल्या घातक चेंडूचा व्हिडिओ
दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी
‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल