जयपूर। बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला आवश्यक असलेली चांगली सुरुवात करुन दिली होती. याबरोबरच त्यांनी या सामन्यादरम्यान एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
न्यूझीलंडने या सामन्यात भारताला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने सलामीला फलंदाजी केली. या दोघांनी चांगली सुरुवात करताना ५० धावांची भागीदारी केली. केएल राहुल ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीविरुद्ध ६ व्या षटकात १५ धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी तुटली.
पण असे असले तरी केएल राहुल आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी भारतीय जोडी ठरली आहे. त्यांच्या जोडीने रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीला मागे टाकले आहे. रोहित आणि शिखर यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ११ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित आणि विराट कोहलीची जोडी आहे. विराट आणि रोहित यांनी ७ वेळा ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. विशेष म्हणजे पहिल्या तीनही जोड्यांमध्ये रोहितचे नाव आहे.
भारताने जिंकला सामना
बुधवारी झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. ४२ चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच्याशिवाय मार्क चॅपमनने देखील अर्धशतकी खेळी करताना ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकांसह ६३ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या.
भारताकडून आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ही खेळी केली. याशिवाय रोहित शर्माने ४८ धावांची खेळी केली. भारताने १९.४ षटकात १६५ धावांचे आव्हान ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ८८ खेळाडू घेणार जोखीम! दिल्लीत विषारी हवेत खेळणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरी
पहिल्याच षटकात फलंदाजाला गोल्डन डकवर बाद करायचंय? मग भुवी आहे ना!
बोल्टचे आभार मानत सूर्यकुमारने पत्नीला दिली वाढदिवशी खास भेट