सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. रोहित शर्मासह भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे अत्यंत सोपे झेल सोडले. मात्र दुखापतग्रस्त रिषभ पंतच्या जागी सबस्टिट्युट विकेटकीपर (बदली यष्टीरक्षक) म्हणून आलेल्या वृद्धिमान साहाने एकाहून एक अप्रतिम झेल पकडत सर्वांना प्रभावित केले.
वृद्धिमान साहा ठरला पहिलाच बदली यष्टीरक्षक
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षण करताना साहाने एक-दोन नव्हे तब्बल चार फलंदाजांचे झेल पकडले. सर्वप्रथम युवा वेगवान गोलंदाजी मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर त्याने ऑस्ट्रेलियाच्या विल पुकोवस्कीचा यष्टीमागे झेल पकडला. त्यामुळे डावाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला पहिले यश मिळाले.
त्यानंतर नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर साहाने मार्नस लॅब्यूशाने आणि मॅथ्यू वेड यांचे अप्रतिम झेल पकडत त्यांना पव्हेलियनला पाठवले. तसेच पुढे कॅमरॉन ग्रीनच्या रुपात संघाला अतिशय महत्त्वपुर्ण विकेट मिळवून दिली. अशाप्रकारे कसोटी सामन्यातील एका डावात बदली यष्टीरक्षक म्हणून खेळताना चार झेल पकडणारा साहा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्यापुर्वी कोणत्याही खेळाडूला हा खास पराक्रम करता आला नाही.
पाकिस्तानी दिग्गज युनूस खानची बरोबरी
बदली क्षेत्ररक्षकाविषयी बोलायचे झाले तर, साहाने सिडनी कसोटीत ४ झेल पकडत पाकिस्तानी दिग्गज युनूस खानची बरोबरी केली आहे. युनूस खान २००१ मध्ये बांग्लादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील एका डावात बदली क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत खेळले होते. यावेळी त्यांनी बांग्लादेशच्या चार फलंदाजांना झेलबाद केले होते.
रिषभ पंतच्या दुखापतीमुळे मिळाली साहाला संधी
सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव चालू असताना यष्टीरक्षक फलंदाज पंतला दुखापत झाली होती. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी माघारी परतल्यानंतर पंत चेतेश्वर पुजारासोबत मिळून डावाला चालना देत होता. ही जोडी तोडण्यासाठी आलेल्या पॅट कमिन्सचा एक वेगवान चेंडू पंतच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला लागला. त्यामुळे त्याच्याजागी यष्टीरक्षक फलंदाज साहाला बदली यष्टीरक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात खेळवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके
‘मैदानावर टिकायचं म्हणून तो चेंडू टोलवताना घाबरत होता’, ऑस्ट्रेलियन दिग्गजांची पुजारावर सडकून टीका