सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज (12 जानेवारी) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतक केले आहे.
हे शतक त्याचे वनडे कारकिर्दीतील 22 वे शतक ठरले आहे. त्यामुळे त्याने वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 22 शतकांची बरोबरी केली आहे.
त्यामुळे आता हे दोघे या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आले आहेत. या यादीत अव्वल स्थानावर 49 शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे तर दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. विराटने 38 शतके केली आहेत.
रोहितने आज 129 चेंडूत 133 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. त्याला मार्कस स्टॉयनिसने बाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 288 धावसंख्या उभारत भारतासमोर 289 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र भारताला 50 षटकात 254 धावाच करता आल्या. भारताकडून रोहित बरोबरच एमएस धोनीने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती.
भारताकडून सर्वाधिक वनडे शतके करणारे फलंदाज –
49 शतके – सचिन तेंडुलकर
38 शतके – विराट कोहली
22 शतके – सौरव गांगुली
22 शतके – रोहित शर्मा
15 शतके – शिखर धवन
15 शतके – विरेंद्र सेहवाग
महत्त्वाच्या बातम्या-
–इतक्या दिवसाची प्रतिक्षा असलेला एमएस धोनीचा तो विक्रम अखेर पूर्ण
–ऍरॉन फिंचची विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा दिग्गजांच्या यादीत समावेश
–हार्दिक पंड्या, केएल राहुल ऐवजी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी