‘रनमशीन’ हे नाव विराट कोहली याच्यासाठी का वापरले जाते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. विराटने तब्बल 1 हजारहून अधिक दिवसांनंतर आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध 71वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले होते. त्यानंतर विराटने थांबायचे नावच घेतले नाहीये. विराटने पुढे अवघ्या 25 दिवसात 72, 73 आणि 74वे शतक झळकावले. त्याचे 74वे शतक हे भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात आले. यासह विराटच्या नावावर मोठा विक्रमही नोंदवला गेला. यामध्ये त्याने ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याचाही विक्रम मोडीत काढला.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या वनडेत भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, जेव्हा रोहित 42 धावांवर तंबूत परतला, तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) याने मैदानावर टिकून टिच्चून फलंदाजी केली. यावेळी विराटने 85 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. यासह तो विक्रमवीरही बनला. विराटने त्याच्या डावात 110 चेंडूंचा सामना करताना 8 षटकार आणि 13 चौकारांसह एकूण 166 धावा चोपल्या.
https://twitter.com/BCCI/status/1614591395515469825
विराट कोहलीने शतक ठोकताच तो मायदेशात वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी पोहोचला. विराटने वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात खेळताना एकूण 21 शतके झळकावली आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने वनडेत मायदेशात 20 शतके केली आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानी असलेल्या हाशिम आमला याने 14, चौथ्या क्रमांकावरील रिकी पाँटिंग याने 13 आणि पाचव्या स्थानी असलेल्या रॉस टेलर याने मायदेशात वनडेत 12 शतके झळकावली आहेत.
मायदेशात वनडेत खेळताना सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
21 शतके- विराट कोहली*
20 शतके- सचिन तेंडुलकर
14 शतके- हाशिम आमला
13 शतके- रिकी पाँटिंग
12 शतके- रॉस टेलर
भारतीय संघाचा डाव
या सामन्यात भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 390 धावा चोपल्या. भारताकडून विराटव्यतिरिक्त शुबमन गिल (Shubman Gill) यानेही शतक झळकावले. त्याने 97 चेंडूत 116 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 14 चौकारांचा पाऊस पाडला. तसेच, कर्णधार रोहित शर्मा (42) आणि श्रेयस अय्यर (38) यांनीही खारीचा वाटा उचलला.
श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना कसून रजिता आणि लहिरु कुमारा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, चमिका करुणारत्ने यानेही 1 विकेट नावावर केली. (Most centuries in ODIs on home soil virat kohli top in the list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
षटकार किंग हिटमॅनच! श्रीलंकेविरुद्ध पहिला सिक्सर मारताच धोनीला ‘या’ यादीत टाकले मागे
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच






