भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023चा तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. बुधवारपासून (दि. 1 मार्च) इंदोर येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीत भारताची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीला आल्यानंतर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज चमकले. अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने तर 3 विकेट्स काढत विक्रम रचला. तसेच, कपिल देव यांनाही मागे टाकले.
झाले असे की, भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने पहिल्या डावात 33.2 षटकात 10 विकेट्स गमावत 109 धावाच केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आली, तेव्हा त्यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावत 156 धावा केल्या होत्या. या 4 विकेट्स भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने घेतलेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 6 विकेट्स गमावत 197 धावांवर गाशा गुंडाळला. या 6 विकेट्सपैकी 3 विकेट्स उमेश यादव (Umesh Yadav) याने आणि 3 विकेट्स आर अश्विन (R Ashwin) याने घेतल्या.
अश्विनने 3 विकेट्स घेताच खास विक्रम रचला. अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला. त्याने या विक्रमात कपिल देव यांनाही मागे टाकले. कपिल पाजींच्या 687 विकेट्स आहेत, तर अश्विनच्या नावावर 689 विकेट्सचा समावेश झाला आहे. (Most international wickets for India R Ashwin overtake kapil dev)
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे अव्वलस्थानी आहे. त्याने 953 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी हरभजन सिंग आहे. हरभजनने 707 विकेट्स नावावर केल्या आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी कपिल पाजी असून त्यांनी 687 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, पाचव्या स्थानी वेगवान गोलंदाज झहीर खान असून त्याने 597 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.
हरभजनचा विक्रम मोडण्यासाठी 18 विकेट्सची गरज
अशात आर अश्विनच्या निशाण्यावर हरभजन सिंग याच्या 707 विकेट्सचा विक्रम आहे. हा टप्पा पार करण्यासाठी अश्विनला आणखी 18 विकेट्सची गरज आहे.
भारताकडून सर्वाधिक आंतररराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
953 विकेट्स- अनिल कुंबळे
707 विकेट्स- हरभजन सिंग
689 विकेट्स- आर अश्विन
687 विकेट्स- कपिल देव
597 विकेट्स- झहीर खान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा दमदार खेळाडू सर्जरीसाठी न्यूझीलंडला होणार रवाना! आर्चरला फिट करणाऱ्या सर्जनला केलंय पाचारण
भारतीय गोलंदाजांनी पुन्हा दाखवली कमाल, 200 धावांच्या आत ऑस्ट्रेलिया सर्वबाद