ऍडलेड। भारताने आज(15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 104 धावांची शतकी खेळी केली आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा त्याचा वनडेमधील 31 वा सामनावीराचा पुरस्कार आहे.
त्यामुळे त्याने वनडेमध्ये सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सौरव गांगुलीची बरोबरी केली आहे. गांगुलीनेही 31 वेळा वऩडेमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे हे दोघे या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. तेंडुलकरने 62 वेळा वनडेत सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे.
त्याचबरोबर ऍडलेडवर वनडेमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा विराट एमएस धोनी नंतरचा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. धोनीला 2012 मध्ये श्रीलंकाविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
विराटने या सामन्यात 112 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील 39 वे शतके आहे. त्याने हे शतक 108 चेंडूतच पूर्ण केले होते.
विराटने आज या सामन्यात रोहित शर्माबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची, अंबाती रायडूबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची आणि एमएस धोनीबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–त्या यादीत सचिन, लक्ष्मण, मनीष पांडेसह आता विराटचेही नाव
–ऍडलेड ठरले विराट कोहलीसाठी लकी
–अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये