वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावर जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. पाकिस्तान संघ तब्बल 7 वर्षांनंतर भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे. विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध 7 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात भारतानेच विजय मिळवला आहे. अशात भारतीय संघ हा विक्रम आणखी चांगला करण्याच्या इराद्याने मैदानात उरतेल. तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात की, अहमदाबाद येथील या मैदानावर वनडेत कोणत्या 5 भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. या पाचपैकी दोघे जण पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहेत.
1. राहुल द्रविड
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे वनडेत सर्वाधिक धावांचा पाऊस पाडण्याचा पराक्रम राहुल द्रविड याने केला आहे. त्याने 5 सामने खेळताना 342 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 2 शतकेही निघाली आहेत. या मैदानावरील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 109 इतकी राहिली आहे. मात्र, तो क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
2. रोहित शर्मा
अहमदाबादच्या मैदानावर वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा दुसरा क्रमांक लागतो. रोहितने 5 सामन्यात 221 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या मैदानावर त्याचा स्ट्राईक रेट हा 94.04 इतका आहे. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून भारतीय क्रिकेटप्रेमींना भरपूर अपेक्षा असतील.
3. सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने अहमदाबादच्या या मैदानात 5 सामने खेळताना 215 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतकाचाही समावेश आहे. अहमदाबादमधील मैदानावर त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 123 इतकी राहिली आहे. सचिन 2013मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.
4. सौरव गांगुली
सौरव गांगुली याने अहमदाबादच्या मैदानावर 3 सामने खेळले होता. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 190 धावांचा पाऊस पडला. यात एका शतकाचाही समावेश राहिला आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 94.52 इतका राहिलेला. गांगुलीने 2008मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
5. विराट कोहली
विराट कोहली याने अहमदाबादच्या मैदानावर 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला 176 धावा करता आल्या आहेत. विराट आतापर्यंत या मैदानावर शतक ठोकू शकला नाहीये. मात्र, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याची बॅट नेहमीच आग ओकते. वनडे विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते. आता यावेळीही चाहत्यांना त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (most odi runs in ahmedabad narendra modi stadium know ahead of india vs pakistan 2023)
हेही वाचा-
विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्ध 7-0चा तगडा रेकॉर्ड, पण रोहितची हैराण करणारी प्रतिक्रिया; म्हणाला…
पाकिस्तानविरुद्ध गिल खेळणार का? कॅप्टन रोहितने दिले ‘हे’ उत्तर