सूर्यकुमार यादवनं श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेद्वारे भारताचा नियमित कर्णधार म्हणून वाटचाल सुरू केली. सूर्यानं मालिकेतील पहिल्या सामन्यात 58, दुसऱ्या सामन्यात 26 तर तिसऱ्या सामन्यात 8 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर त्यानं कमालच केली. सूर्यानं सामन्याच्या 20व्या ओव्हरमध्ये 5 धावा देऊन 2 बळी घेतले. संपूर्ण मालिकेतील त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी सूर्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. यासह सूर्यकुमार यादवनं रोहित शर्माचा एक विक्रम मोडला आहे. आता फक्त विराट कोहलीच त्याच्या पुढे आहे.
विराट कोहलीनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकले आहे. विराट कोहलीनं हा पुरस्कार तीन वेळा पटकावलाय. सूर्यकुमार यादवनं तीन मालिकांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं, ज्यापैकी दोन मालिकांमध्ये तो ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ बनला आहे. या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला कर्णधार असताना एकदा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ चा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय सुरेश रैना आणि हार्दिक पांड्या यांचीही प्रत्येकी एकदा कर्णधार असताना मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय.
सूर्यकुमार यादवनं टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये एकूण 5 वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार जिंकला आहे. या यादीत विराट कोहली 7 पुरस्कारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. शाकिब अल हसन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी देखील त्यांच्या देशासाठी टी20 मध्ये प्रत्येकी 5 वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम संयुक्तपणे सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे. सूर्या आणि विराट कोहलीनं प्रत्येकी 16 वेळा हा पुरस्कार जिंकलाय. परंतु सूर्याने कोहलीपेक्षा जवळपास 50 सामने कमी खेळले आहेत. सिकंदर रझा टी20 मध्ये 15 वेळा सामनावीर ठरला आहे. तर रोहित शर्मा आणि मोहम्मद नबीनं 14-14 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
हेही वाचा –
टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं, भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड
श्रीलंकेविरुद्ध रिंकू सिंहला 19वा ओव्हर का दिला? कर्णधार सूर्यानं सांगितला ‘मास्टर प्लॅन’!
रिंकूचं 19वं षटक, सूर्याचं 20वं षटक अन् सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये गेम केला! भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा संपूर्ण थरार