क्षेत्ररक्षणाचे क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मैदानावर असे बरेचदा घडते, जेव्हा एखादा झेल सोडल्यामुळे संघाला सामना गमवावा लागतो. याशिवाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने चांगल्या क्षेत्ररक्षणाद्वारे वाचवलेल्या १०-१५ धावा सामन्यात निर्णायक ठरतात.
आयपीएल २०२१ मध्ये शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईच्या रवींद्र जडेजाने पंजाबचा कर्णधार केएल राहुलला आपल्या अचूक थ्रोने तंबूचा मार्ग दाखविला. यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक धावबाद करणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत तो अव्वलस्थानी पोहोचला. आज या लेखात आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावबाद करणाऱ्या क्षेत्ररक्षकांविषयी जाणून घेणार आहोत.
१) रवींद्र जडेजा
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेला जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो. तो प्रत्येक सामन्यात आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणद्वारे संघासाठी बहुमूल्य ७-१० धावा वाचवताना दिसतो. जडेजाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स व चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याने १८६ सामन्यात खेळताना सर्वाधिक २२ खेळाडूंना धावबाद करण्याचा विक्रम नोंदविला आहे.
२) विराट कोहली
आयपीएलमध्ये सर्व हंगाम एकाच संघासाठी खेळणारा एकमेव खेळाडू म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जाते. सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार असलेला विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्याने १९४ सामन्यात २१ फलंदाजांना धावबादच्या रूपाने बाद केले आहे.
३) मनीष पांडे
आयपीएल २०२१ मध्ये आपल्या संथ फलंदाजीमुळे टीकेचा धनी बनलेला सनरायझर्स हैदराबादचा मनीष पांडे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. पांडेने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १४८ सामन्यात १६ खेळाडूंना धावबाद करण्याचा पराक्रम केला आहे.
४) सुरेश रैना
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणसाठी रैना प्रसिद्ध आहे. रैनाने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९५ सामने खेळताना १६ खेळाडूंना धावबाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘यॉर्कर किंग’ नटराजनला का मिळाली नाही बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत जागा? जाणून घ्या कारण
बुमराह-बोल्ट नव्हे राहुल चहर मुंबईचा ‘विकेट टेकर’ गोलंदाज; प्रशिक्षकाने उधळली स्तुतिसुमने