मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने १८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला असला तरी एक खास विक्रम कोलकाता संघाचा सलामीवीर शुबमन गिलच्या नावे झाला आहे.
खरंतर चेन्नईने दिलेल्या २२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिल पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची शुबमनची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये पहिल्यांदा शुन्यावर बाद होण्याआधी सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५ वा क्रमांक मिळवला आहे.
शुबमनने या सामन्यापूर्वी आयपीएमध्ये ४४ सामन्यात १००८ धावा केल्या होत्या. त्यानंतर तो ४५ वा सामना खेळताना पहिल्यांदाच शुन्यावर बाद झाला.
आयपीएलमध्ये पहिल्यांदा शुन्यावर बाद होण्याआधी सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर डेव्हिड मिलर आहे. त्याने आयपीएलमध्ये पहिल्यांदा शुन्यावर बाद होण्यापूर्वी १४५० धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर रैना आहे. रैनाने पहिल्यांदा शुन्यावर बाद होण्यापूर्वी आयपीएलमध्ये १४०८ धावा केल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ ११५४ धावांसर ड्वेन ब्रावो आणि १०७६ धावांवर मॅथ्यू हेडन आहे. त्यांच्यानंतर आता ५ व्या क्रमांकावर १००८ धावांवर गिल आला आहे.
चेन्नईचा कोलकातावर विजय
या सामन्यात चेन्नईने फाफ डू प्लेसिसच्या ९५ आणि ऋतुराज गायकवाडच्या ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांना मोईन अलीच्या २५ आणि एमएस धोनीच्या १७ धावांच्या छोटेखानी पण आक्रमक खेळीचीही साथ लाभली. कोलकाताकडून आंद्रे रसल, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली होती.
प्रतिउत्तरादाखल २२१ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी ३१ धावांतच ५ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यांनंतर आंद्रे रसलने दिनेश कार्तिकला साथीला घेत केलेल्या वादळी खेळीने कोलकाताला सामन्यात पुनरागमन करुन दिले होते.
आंद्र रसलने आक्रमक खेळ करताना २२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. त्याने कार्तिकसह ८१ धावांची भागीदारी केली. मात्र, १२ व्या षटकात सॅम करनने रसलला त्रिफळाचीत केले. त्याच्यापाठोपाठ १५ व्या षटकात दिनेश कार्तिक २४ चेंडूत ४० धावा करुन लुंगी एन्गिडीच्या चेंडूवर पायचीत झाला.
मात्र, यानंतरही पॅट कमिन्सने आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना अर्धशतक केले. मात्र, त्याला दुसऱ्या बाजून भक्कम साथ द्यायला कोणी नसल्याने अखेर कोलकाताचा डाव १९.१ षटकात २०२ धावांवर संपुष्टात आला. कमिन्स ३४ चेंडूत ६६ धावांची खेळी करुन नाबाद राहिला. त्याने ४ चौकार आणि ६ षटकार या खेळी दरम्यान मारले. चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच लुंगी एन्गिडीने ३ विकेट्स घेतल्या आणि सॅम करनने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या आई-वडीलांच्या आरोग्याबाबत साक्षीने दिले महत्त्वाचे अपडेट्स; म्हणाली…
फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट
‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर