विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. पण असे असले तरी त्याने 129 धावाही दिल्या आहेत.
त्याने या सामन्यातील पहिल्या डावातही 3 विकेट्स घेतल्या परंतू 189 धावा दिल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून 5 विकेट्स घेताना तब्बल 318 धावा दिल्या आहेत.
याचमुळे तो एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडीजचे माजी गोलंदाज टॉमी स्कॉट आहेत. त्यांनी 1930 ला इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात किंग्सटनला झालेल्या कसोटीत 9 विकेट्स घेताना 374 धावा दिल्या होत्या.
तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जेसन क्रेजझा आहे. त्याने 2008 ला भारताविरुद्ध नागपूरला झालेल्या कसोटी सामन्यात 12 विकेट्स घेताना 358 धावा दिल्या होत्या.
आत्तापर्यंत केवळ 4 गोलंदाजांनी एका कसोटी सामन्यात 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावा गोलंदाजी करताना दिल्या आहेत. यामध्ये आर्थर मेली या ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाजाने दोन कसोटी सामन्यात प्रत्येकी 300 पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत.
त्यांनी 1924 ला इंग्लंड विरुद्ध सिडनी येथे 7 विकेट्स घेताना 308 धावा तर 1921 ला इंग्लंड विरुद्धच ऍडलेड येथे 10 विकेट्स घेताना 302 धावा दिल्या होत्या.
केशव महाराजच्या नावावर हाही नकोसा विक्रम –
दक्षिण आफ्रिकेकडून एका कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम याआधीही केशव महाराजच्याच नावावर होता.
त्याने 2018 मध्ये कोलंबोला झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 12 विकेट्स घेताना 283 धावा दिल्या होत्या. आता त्याने भारताविरुद्ध विशाखापट्टणमला सुरु असलेल्या कसोटीत 318 धावा दिल्याने स्वत:चाच विक्रम मागे टाकला आहे.
अशी आहे सामन्याची स्थिती –
विशाखापट्टणमला सुरु असलेल्या या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारताने पहिल्या डावात घेतलेल्या 71 धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले आहे.
दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवसाखेर(5 ऑक्टोबर) 9 षटकात 1 बाद 11 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करम(3) आणि थेऊनिस डी ब्रून(5) नाबाद खेळत आहेत. भारताकडून रविंद्र जडेजाने डिन एल्गारची(2) विकेट घेतली आहे.
तत्पूर्वी या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपल्याने भारताने 71 धावांची आघाडी घेतली होती.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज –
374 धावा (9 विकेट्) – टॉमी स्कॉट (वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड, किंग्सटन, 1930)
358 धावा (12 विकेट्स) – जेसन क्रेजझा (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, नागपूर 2008)
318 धावा (5 विकेट्स) – केशव महाराज (दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, विशाखापट्टणम, 2019)
308 धावा (7 विकेट्स) – आर्थर मेली (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, सिडनी, 1924)
302 धावा (10 विकेट्स) – आर्थर मेली (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, ऍडलेड, 1921)