साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियम, ऍजबॅस्टन येथे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम केला आहे.
विराटने या सामन्यात खेळताना भारताकडून पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेर नाबाद ४४ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने आयसीसीतर्फे आयजित स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये खेळताना २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. हा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
आयसीसी स्पर्धांच्या ५ अंतिम सामन्यांत खेळताना विराटच्या आता २०४ धावा झाल्या आहेत. आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने गौतम गंभीरला मागे टाकले आहे. गंभीरने २ आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांत खेळताना १७२ धावा केल्या आहेत. तर या यादीत तिसर्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. गांगुलीने ४ आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांत १४१ धावा केल्या आहेत.
पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरु
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (१८ जून) सुरु होणार होता. मात्र, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने नाणेफेकही होऊ शकली नाही. अखेर शनिवारी साऊथॅम्पटनमध्ये ऊन पडल्याने हा सामना नियोजित वेळेनुसार सुरु झाला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, शनिवारी सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या अखेरीस कमी प्रकाशाचा व्यत्यय येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ ६५ व्या षटकादरम्यान थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवसाखेर भारताने ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या आहेत. विराट ४४ धावांवर नाबाद आहे आणि अजिंक्य रहाणे २९ धावांवर नाबाद आहे.
विराटने धोनीला टाकले मागे
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा विराटचा कर्णधार म्हणून ६१ वा कसोटी सामना आहे. त्यामुळे तो सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने या विक्रमाच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने कसोटीमध्ये ६० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलसाठी मैदानात उतरताच विराट बनला ‘असा’ कारनामा करणारा जगातील एकमेव खेळाडू
“रिषभ पंतने तसा फटका मारला तर हा माझा अपमान”
‘त्या’ कृत्यामूळे घडले सिराजच्या माणुसकीचे दर्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल