---Advertisement---

‘रनमशीन’ कोहली बनला नंबर-१ कर्णधार; केली ‘ही’ विशेष कामगिरी

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 6:37 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यानच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. हा सामना ऍडलेड ओव्हल या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने संयमी अर्धशतक झळकावत भारताचा डाव सावरण्यात मोलाची कामगिरी केली. या खेळीदरम्यान विराटने एक नवीन विक्रम आपल्या नावे केला. विराट आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा काढणारा भारतीय कर्णधार बनला आहे.

पहिल्या षटकात भारताला बसला धक्का
अत्यंत मानाच्या म्हटल्या जाणाऱ्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिकेला आज सुरुवात झाली. ऍडलेड ओव्हलवरील या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉची शून्यावर दांडी गुल करत, भारताला पहिला धक्का दिला. दुसरा सलामीवीर मयंक अगरवालला पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले. मयंक बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या ३२ धावांवर २ बाद अशी होती.

विराटने सावरला भारताचा डाव
सुरुवातीच्या धक्क्यानंतर सावरत अनुभवी चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या गड्यासाठी ६८ धावा जोडत भारताची धावसंख्या १०० पर्यंत पोहोचवली. पुजाराच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कर्णधार विराटने अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव १५० धावांपलीकडे नेला. संघाच्या १८८ धावा झाल्या असताना विराट रहाणेच्या चुकीमुळे ७४ धावांवर धावबाद झाला.

विराटने मागे टाकले धोनीला
विराटने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान एक विक्रम आपल्या नावे केला. विराट आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा कर्णधार बनला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये दहाव्या सामन्यात नेतृत्त्व करताना विराटने ८१४ धावा काढल्या आहेत. यापूर्वी, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा काढण्याचा मान एमएस धोनीकडे होता. त्याने १२ सामन्यात नेतृत्त्व करताना ८१३ धावा काढल्या होत्या. विराट आणि धोनीपाठोपाठ सौरव गांगुलीने या प्रतिष्ठेच्या मालिकेत कर्णधार म्हणून ४४९ धावा काढल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

AUS vs IND Test Live : कोहलीचे अर्धशतक, कांगारूंकडून टिच्चून गोलंदाजी; ६१ षटकात भारत ३ बाद १२८ धावांवर

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास! ‘या’ फलंदाजाने ८७ वर्षांपूर्वी झळकावले होते पहिले शतक

पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---