आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी मोठेमोठे विक्रम केले आहेत. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रीय खेळाडूंचे योगदानही मोठे आहे. अशाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन खेळाडू –
५. अजिंक्य रहाणे –
भारतीय कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने भारताकडून इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर येथे ऑगस्ट २०११ ला टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले.
त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५ कसोटी, ९० वनडे आणि २० टी२० सामने असे मिळून एकूण १७५ सामने खेळताना ३७.७० च्या सरासरीने ७५४० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १४ शतकांचा आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे.
४. दिलीप वेंगसरकर –
७० आणि ८० च्या दशकात सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे क्रिकेटपटू म्हणजे दिलीप वेंगसकर. जानेवारी १९७६ ला न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंडला झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वेंगसरकरांनी लॉर्ड्सच्या मैदानावर सलग तीन शतके करण्याचा पराक्रमही केला.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४५ सामन्यात ३९.३० च्या सरासरीने १८ शतके आणि ५८ अर्धशतकांसह १०३७६ धावा केल्या.
३. सुनिल गावसकर –
‘लिटील मास्टर’ सुनील गावसकरांनी १६ वर्षे भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीची धूरा समर्थपणे सांभाळली. ही धूरा सांभाळताना त्यांनी अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. १९७१ ला वेस्ट इंडिज विरुद्धच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
त्यांनी १२५ कसोटी आणि १०८ वनडे असे मिळून एकूण २३३ सामने खेळताना ४६.२० च्या सरासरीने १३२१४ धावा केल्या. यामध्ये त्यांनी ३५ शतके आणि ७२ अर्धशतके केली आहेत.
२. रोहित शर्मा – भारतीय वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षात त्याच्या दमदार खेळीने वेगळीच छाप उमटवली आहे. २००७ ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण करणारा रोहित आज एक दिग्गज सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जातो.
२००७ रोहितने वनडे आणि टी२० अशा दोन्ही प्रकारात पदार्पण केले. पण कसोटीत पदार्पण करण्यासाठी मात्र त्याला २०१३ सालाची वाट पहावी लागली. रोहितने आत्तापर्यंत ३२ कसोटी, २२४ वनडे आणि १०८ टी२० सामने असे मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६४ सामने खेळले आहेत.
या ३६४ सामन्यांमध्ये त्याने ४४.३९ च्या सरासरीने १४०२९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३९ शतकांचा आणि ७४ अर्धशतकांचा समावेश आहे.
१. सचिन तेंडुलकर – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे.
मुंबईत रहाणाऱ्या सचिनने वयाच्या १६ व्या वर्षीत १९८९ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ वनडे आणि १ टी२० सामना असे मिळून ६६४ सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत.
त्याने ६६४ सामन्यात ४८.५२ च्या सरासरीने ३४३५७ धावा केल्या असून सर्वाधिक १०० शतके आणि १६४ अर्धशतके केली आहेत.
ट्रेंडिंग लेख –
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध परदेशात विजय मिळविणारे ५ संघ, टीम इंडियाबद्दल घ्या जाणून
एकदा नाही, दोनदा नाही तर या ५ वेळा रोहितने गोलंदाजांना धु धु धुतले