भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथे पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २२४ धावांचा डोंगर रचला. भारतासाठी कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी दमदार अर्धशतके झळकावली. या सामन्यात अर्धशतक झळकावताच विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे विराट
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराटने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या मालिकेत पाच सामन्यात तीन अर्धशतके ठोकली. पहिल्या सामन्यात खातेही न होऊ शकलेला विराट नंतरच्या सामन्यात गोलंदाजांची पिसे काढताना दिसून आला.
त्याने दुसऱ्या सामन्यात ७२ धावांची नाबाद खेळी केली तर, तिसऱ्या सामन्यात ७८ धावा ठोकून त्याने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती. चौथ्या सामन्यात मात्र तो केवळ १ धाव बनवू शकला होता. परंतु, अखेरच्या सामन्यात त्याने पुन्हा पुनरागमन करत ८० धावांची नाबाद खेळी केली.
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला विराट
विराट कोहली कसोटी क्रिकेटचा दर्जा असणाऱ्या संघांमधील एका द्विपक्षीय टी२० मालिकेत सर्वाधिक धावा बनविणारा फलंदाज बनला. विराटने या मालिकेत २३१ बनवत हा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम भारताचाच सलामीवीर केएल राहुलच्या नावे होता. त्याने २०२० मध्ये न्यूझीलंड दौर्यावर पाच टी२० सामने खेळत २२४ धावा फटकावल्या होत्या.
न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर कॉलिन मुन्रो याने २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध अवघे तीन सामने खेळताना २२३ धावा ठोकल्या होत्या. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हॅमिल्टन मासाकाद्झा यानेदेखील बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत २२२ धावा काढल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मलानचा विश्वविक्रम! ६५ वी धाव घेताच कोहली, बाबर आझमला टाकले मागे
आशिया खंडात डंका वाजवलेल्या दिग्गज फलंदाजांच्या ‘या’ खास यादीत आता विराटचाही समावेश
रोहित शर्माने अर्धशतक तर झळकावलेच पण या मानाच्या यादीतही पटकावले दुसरे स्थान





