---Advertisement---

पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडच्या सर्वात उंच गोलंदाजाने केली मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी

On: शनिवार, फेब्रुवारी 8, 2020 6:53 PM
---Advertisement---

ऑकलँड। आज(8 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात इडन पार्कवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 22 धावांनी विजय मिळवला आणि वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि काईल जेमिसनने केलेली 9 व्या विकेटसाठीची 76 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. न्यूझीलंडची मधलीफळी भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर गडगडल्यानंतर या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या जेमिसनने एका बाजून लढणाऱ्या टेलरला चांगली साथ दिली.

जेमिसनने 24 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 25 धावा केल्या. यामुळे त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.

जेमिसनने वनडेमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार मारण्याच्या अभिमन्यू मिथूनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. भारताचा क्रिकेटपटू मिथूननेही 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये वनडे पदार्पण करताना 10 व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. यावेळी त्यानेही 23 चेंडूत 2 षटकारांसह 24 धावा केल्या होत्या.

या दोघांव्यतिरिक्त 12 खेळाडूंना वनडे पदार्पणाच्या सामन्यात 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 1 षटकार मारता आला आहे.

आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून टेलरने नाबाद 73 धावांची तर  मार्टिन गप्टिलने 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 273 धावा केल्या आणि भारताला 274 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 48.3 षटकात सर्वबाद 251 धावाच करता आल्या.

या सामन्यात जेमिसनने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 42 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांना त्रिफळाचीत केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---