मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवताना 30 षटकांच्या आतच 123 धावांत ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाजांना बाद केले आहे. यावेळी 24 व्या षटकात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्शला यष्टीचीत केले. याबरोबरच एक खास विक्रमही रचला आहे.
मार्श हा धोनीचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा वनडेतील 17 वा यष्टीचीत ठरला आहे. त्यामुळे धोनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक ठरला आहे.
धोनी श्रीलंका आणि इंग्लंड विरुद्धही वनडेत सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक आहे. त्याने श्रीलंका विरुद्ध 24 तर इंग्लंड विरुद्ध 16 यष्टीचीत केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 यष्टीचीत करत धोनीने एका प्रतिस्पर्धी विरुद्ध सर्वाधिक यष्टीचीत करण्याच्या यादीत त्याचाच इंग्लंड विरुद्धच्या 16 यष्टीचीतच्या विक्रमालाच मागे टाकले आहे.
एका प्रतिस्पर्धी विरुद्ध सर्वाधिक यष्टीचीत करणारे यष्टीरक्षक:
24 – एमएस धोनी विरुद्ध श्रीलंका
22 – रोमेश कालुविधाराना विरुद्ध पाकिस्तान
19 – मुशफिकुर रहिम विरुद्ध झिम्बाब्वे
19 – कुमार संगकारा विरुद्ध दक्षिण आफ्रिका
17 – एमएस धोनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया
16 – एमएस धोनी विरुद्ध इंग्लंड
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताकडून आज वनडे पदार्पण करणारा कोण आहे विजय शंकर…
–रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत या संघाने केला पहिल्यांदाच प्रवेश
–टॉप १०: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वनडे सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष