साउथँम्पटन। शनिवारी(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला.
या विजयाबरोबर भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीसाठी देखील हा सामना खास ठरला आहे. त्याने या सामन्यात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर राशिद खानला 14 धावांवर असताना यष्टीचीत केले. त्यामुळे धोनीचे अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 140 यष्टीचीत झाले आहेत.
याबरोबरच तो अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षकही ठरला आहे. त्याने हा विश्वविक्रम करताना पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक मोईन खान यांच्या 139 यष्टीचीतच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
विश्वचषकातही धोनीने केला विक्रम –
विश्वचषकात धोनीचे हे एकूण 7 वे यष्टीचीत आहे. त्यामुळे विश्वचषकात सर्वाधिक यष्टीचीत करण्याच्या यादीत त्याने ऍडम गिलख्रिस्ट, मोईन खान यांची बरोबरी करत संयुक्तरित्या दुसरे स्थान मिळवले आहे. या यादीत 13 यष्टीचीतसह श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकारा अव्वल क्रमांकावर आहे.
शनिवारी अफगाणिस्तान विरुद्ध धोनीने यष्टीरक्षणात जरी चांगली कामगिरी केली असली तरी फलंदाजीत मात्र त्याला खास काही करता आले नाही. त्याने 52 चेंडूत 28 धावांची खेळी केली.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 224 धावा करत अफगाणिस्तान समोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 49.5 षटकात सर्वबाद 213 धावाच करता आल्या.
#अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारे यष्टीरक्षक –
140 यष्टीचीत – एमएस धोनी
139 यष्टीचीत – मोईन खान
129 यष्टीचीत – स्टिव्ह ऱ्होड्स
124 यष्टीचीत – कुमार संगकारा
99 यष्टीचीत – पॉल निक्सन
#वनडे विश्वचषकात सर्वाधिक यष्टीचीत करणारे यष्टीरक्षक –
13 यष्टीचीत – कुमार संगकारा
7 यष्टीचीत – ऍडम गिलख्रिस्ट, मोईन अली, एमएस धोनी
6 यष्टीचीत – कमरान अकमल, किरण मोरे
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड नंतर विश्वचषकात असा पराक्रम करणारा भारत केवळ तिसराच संघ
–संपूर्ण यादी – आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतले आहेत विश्वचषकात हॅट्रिक
–मोहम्मद शमीने घेतली विश्वचषक २०१९ मधील पहिली हॅट्रिक, पहा व्हिडिओ