क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरी भारताला क्रिकेटवेड्या लोकांचा देश म्हणून संबोधले जाते. कोलकाताचे ईडन गार्डन स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम, बेंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम ही भारत देशातील काही प्रसिद्ध क्रिकेट मैदाने आहेत. यात चेन्नईतील चेपॉक नावाने प्रसिद्ध एमए चिंदबरम स्टेडियमचीही गणना केली जाते. याच मैदानावर ५ ते ९ फेब्रुवारी आणि १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत भारत आणि इंग्लंड संघात कसोटी सामन्यांची लढत होणार आहे. हे दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने क्रिकेट रसिकांचे या कसोटी सामन्यांद्वारे पैसावसूल मनोरंजन होणार हे निश्चित आहे.
तत्पुर्वी या लेखात आम्ही चेन्नईच्या स्टेडियमवर झालेल्या काही रोमहर्षक कसोटी सामन्यांचा आढावा घेतला आहे.
चला तर नजर टाकूया त्या सामन्यांवर…
भारत विरुद्ध पाकिस्तान (अवघ्या १२ धावांनी भारताचा पराभव)
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर १९९९ साली २८ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत कट्टर विरोधक भारत आणि पाकिस्तान संघात थरारक कसोटी सामना झाला होता. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ केवळ २३८ धावांवर गारद झाला होता. यष्टीरक्षक फलंदाज मोईन खान यांच्या सर्वाधिक ६० धावांचा यात समावेश होता. सोबतच मोहम्मद युसुफ यांच्या अर्धशतकी खेळीचे योगदान दिले होते. भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी पाकिस्तानच्या पहिल्या डावात चमकदार कामगिरी करत सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.
प्रत्युत्तरात राहुल द्रविड (५३ धावा) आणि सौरव गांगुली (५४ धावा) यांच्या अर्धशतकामुळे भारताने २५४ धावा केल्या होत्या. पुढे दुसऱ्या डावात तत्कालिन पाकिस्तानी सलामीवीर शाहिद आफ्रिदीने शतक ठोकले होते. आफ्रिदीच्या या आक्रमक फलंदाजीमुळे पाकिस्तानने दुसऱ्या डावात भारताला २७० धावांचे आव्हान दिले होते.
राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, व्हिव्हिएस लक्ष्मण, सौरव गांगुली, सचिन तेंडूलकर यांच्यासारखे फलंदाज असल्याने सहज भारतीय संघ पाकिस्तानचे आव्हान गाठेल, याची सर्वांना अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या डावातील २५ षटके संपायच्या आतच संघाचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले. परंतु सचिन आणि नयन मोंगिया यांनी शतकी भागिदारी साकारत संघाचा डाव सावरला होता. अशात पाकिस्तानचा गोलंदाज वसीम अक्रमने ५२ धावांवर मोंगियाला झेलबाद करत त्यांची भागिदारी मोडली.
पुढे सचिनने चिवट झुंज देत २७३ चेंडूत १८ चौकारांच्या मदतीने १३६ धावांची अश्विसनीय खेळी केली होती. विशेष म्हणजे, पाठीत वेदना होत असताना सचिनने लढावू वृत्ती दाखवत जिद्दीने फलंदाजी केली होती. परंतु, पाकिस्तानी गोलंदाज सकलेन मुश्ताकने वसीम अक्रमच्या हातून सचिनला झेलबाद केले. त्यानंतर भारताचे खालच्या फळीतील फलंदाजांना दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत आणि अखेर अवघ्या १२ धावांनी पाकिस्तानने भारताला नमवले होते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (कसोटीतील दुसरा बरोबरीत सुटलेला सामना)
कसोटी क्रिकेटमध्ये एका संघाचा विजय आणि दुसऱ्या संघाचा पराजय होणार हे ठरलेले असते. याव्यतिरिक्त बरेच सामने अनिर्णीत राहतात. मात्र एखादा कसोटी सामना बरोबरीत सुटणे हे फार क्वचित पाहायला मिळते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर फक्त दोनच सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यातील एक सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झाला होता. सप्टेंबर १९८६ साली चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भलेमोठे आव्हान उभारले असूनही शेवटी भारतीय खेळाडूंना सामना बरोबरीवर आणण्यात यश मिळाले होते.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी एक द्विशतक आणि २ शतके करत तब्बल ५७४ धावांचे आव्हान भारतापुढे उभारले होते. डिन जोन्स यांनी सर्वाधिक २१० धावा तर तत्कालिन कर्णधार ऍलन बॉर्डर (१०६ धावा) आणि सलामीवीर डेविड बून (१२२ धावा) यांनी मोठ्या आकडी धावा केल्या होत्या. अखेर ५७४ धावांवर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाचे तत्कालिन कर्णधार कपिल देव यांनी चिवट झुंज ११९ धावा केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ३९७ धावांवर भारताचा संघ गारद झाला होता.
पुढे पहिल्या डावातील १७७ धावांच्या आघाडीत १७० धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३४८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुनिल गावसकरांनी ९० धावांची झुंज दिली. तसेच मोहिंदर अमरनाथ यांनी अर्धशतक केले. परंतु आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधली फळी जास्त धावा जोडू शकली नाही. मात्र तळातील फलंदाजांनी कशाबशा ३४७ धावांवर डाव आणला आणि भारताचे दहाच्या दहा गडी बाद झाले. त्यामुळे अखेर सामना बरोबरीत सुटला.
भारताला भारतात पराभूत केलेल्या इंग्लंडचे ‘हे’ ३ खेळाडू, जे आजही खेळत आहेत कसोटी क्रिकेट
…अन् ‘या’ पठ्ठ्याने अवघ्या २५व्या वर्षी झळकाविले त्रिशतक!