आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू झाला असून या आयपीएल सत्रात सर्वच संघातील खेळाडू विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु, ज्या संघाची रणनिती आणि धोरण हे इतर संघांपेक्षा वेगळे असणार तोच संघ आयपीएल चषकावरती आपले नाव कोरू शकतो. संघासाठी योग्य रणनिती आखण्यात प्रशिक्षकाची भूमिका सर्वात महत्वाची असते. संघाचे उत्कृष्ट अकरा खेळाडू निवडण्यापासून ते नियोजनपूर्व कर्णधाराला मैदानात उतरवण्यापर्यंत प्रशिक्षकाची महत्वपूर्ण भूमिका असते.
आयपीएलमध्ये एका कर्णधाराच्या खांद्यावर जशा अनेक जबाबदाऱ्या असतात तसेच प्रशिक्षकाचीही कामगीरी महत्त्वाची असते. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात अनेक सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक झाले आहेत. त्यापैकी काही प्रशिक्षकांनी चांगली कामगिरी केली आहे. तर आज आम्ही तुम्हाला आयपीएलमधील 3 प्रशिक्षकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची आयपीएलमध्ये 2 किंवा अधिक वेळा त्यांच्या संघासाठी आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका आहे.
स्टीफन फ्लेमिंग- सर्वाधिकवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या प्रशिक्षकांमध्ये स्टीफन फ्लेमिंगचे नाव अव्वल क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा 49 वर्षीय माजी फलंदाज स्टीफन फ्लेमिंग. क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याला ओळखले जाते. आयपीएलच्या पहिल्या सत्रात त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून संघातील फलंदाज म्हणून पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर आयपीएल 2009 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपला मुख्य प्रशिक्षक बनवले.
या अनुभवी खेळाडूनेही 2009, 2010 2018 आणि 2021 या चार सत्रात चेन्नई संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकवून दिले. चेन्नईने आतापर्यंत एकूण चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असून चारही जेतेपदे चेन्नईने फ्लेमिंगच्या प्रशिक्षणाखाली जिंकली आहेत. सध्याचा चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलच्या इतिहासातील एक बलाढ्य संघ मानला जातो, त्यामध्ये फ्लेमिंगचा खूप मोठा हात आहे.
माहेला जयवर्धने- दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंकेचा माजी 44 वर्षीय खेळाडू माहेला जयवर्धने. क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये या खेळाडूला गणले जाते. क्रिकेटच्या इतिहासात कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकेत १०,००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचे नाव येते. तसेच त्याने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळ या संघाकडून सुरुवातीचे 6 हंगाम खेळले आहेत.
साल 2017 पासून तो मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली मुंबई इंडियन्स संघाने 2017, 2019 आणि 2020 या हंगामात आयपीएल विजेतेपद आपल्या नावे केले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे, त्यापैकी तीन विजेतेपदे जयवर्धनेच्या प्रशिक्षणाखाली जिंकली आहेत. जयवर्धने हा मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यापासून मुंबई इंडियन्सचा खेळात अधिक सुधारणा झाली आहे.
ट्रॅव्हर बेलिस- या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे 58 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रॅव्हर बेलिस. त्याने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तरीही त्याला क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी प्रशिक्षक मानले जाते. तसेच त्याच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंडने 2019 चा विश्वचषकही जिंकला होता. सध्या तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षक असून त्याअगोदर टी -20 क्रिकेट लीगमध्ये तो सिडनी सिक्सर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांचा यशस्वी प्रशिक्षक राहिला आहे.
ट्रेव्हर बेलिसने आपल्या प्रशिक्षणाखाली कोलकाता नाईट रायडर्सला 2012 आणि 2014 सालचे आयपीएल विजेतेपद जिंकवून दिले. सन 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने टॉम मूडी यांना प्रशिक्षक पदावरून हटवून ट्रेव्हर बेलिस यांना हैदराबादचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई पुढे मुंबई मागे-मागे, IPLमध्ये दोन्ही संघाबाबत काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात, वाचा…
पॅट कमिन्सचा धमाका, पण कायरन पोलार्डची वादळी खेळी विसरणे कठीणच; पठ्ठ्याने नावावर केलाय नवीन विक्रम




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा