दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (3 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी(Rohit Sharma) हा सामना खास होता. त्याचा बांगलादेश विरुद्धचा हा 9 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता.
त्यामुळे तो बांगलादेश विरुद्ध सर्वाधिक टी20 सामने(Most T20I Matches vs Bangladesh) खेळणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने या यादीत सुरेश रैनाला(Suresh Raina) मागे टाकले आहे. रैनाने बांगलादेश विरुद्ध 8 टी20 सामने खेळले आहेत.
त्याचबरोबर रोहितचा सलामीवीर साथिदार शिखर धवनचा(Shikhar Dhawan) बांगलादेश विरुद्धचा हा 8 वा सामना होता. त्यामुळे त्याने रैनाची या यादीत बरोबरी केली आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध आत्तापर्यंत 9 टी20 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात रोहित खेळला आहे. त्यामुळे भारताकडून बांगलादेश विरुद्धचे सर्व टी20 सामने खेळणारा रोहित एकमेव क्रिकेटपटू आहे.
बांगलादेश विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारे भारतीय –
9 – रोहित शर्मा
8 – शिखर धवन
8 – सुरेश रैना
5 – एमएस धोनी
5 – युवराज सिंग






