पर्थ येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. त्यानं 143 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 100 धावांची खेळी खेळली. आता ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल डे-नाईट कसोटीत कोहलीनं 102 धावा केल्या तर तो एक ‘विश्वविक्रम’ करेल. विराट कोहलीकडे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराट कोहली सध्या ॲडलेडच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. कोहलीनं आतापर्यंत या मैदानावर 509 धावा केल्या आहेत. या यादीत दुसरा क्रमांक वेस्ट इंडिजचा महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा आहे. या मैदानावर सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी 552 कसोटी धावा केल्या आहेत. ब्रायन लारा पहिल्या क्रमांकावर असून त्यानं 611 धावा केल्या आहेत.
आता कोहलीला लाराचा विक्रम मोडण्यासाठी आणि ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. तर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला फक्त 44 धावांची गरज आहे. आता कोहली ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा
ब्रायन लारा – 610 धावा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स – 552 धावा
विराट कोहली – 509 धावा
वॅली हॅमंड – 482 धावा
लिओनार्ड हटन – 456 धावा
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीनं जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टनमध्ये कसोटी पदार्पण केलं. कोहलीनं त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 119 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 203 डावांमध्ये त्यानं 48.13 च्या सरासरीनं 9145 धावा केल्या. कसोटीत त्यानं 30 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 धावा आहे.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा विराट कोहलीबाबत मोठा खुलासा; म्हणाले, “त्याची फॅन फॉलोइंग…”
जसप्रीत बुमराह इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला गोलंदाज!
अजिंक्य रहाणे होणार केकेआरचा पुढील कर्णधार? आयपीएल 2025 पूर्वी मोठं अपडेट जाणून घ्या