इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान सुरू असलेल्या हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर पूर्णपणे यजमान इंग्लंडने वर्चस्व गाजवले. कर्णधार जो रूटच्या शतकी तसेच बर्न्स, हमीद व मलान यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने भारतावर ३४५ धावांची आघाडी मिळवली आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक झळकावत रूटने अनेक विक्रम आपल्या नावे केले. तसेच तो २०२१ या वर्षात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत खूप पुढे निघून गेला आहे.
चालू वर्षे रूटच्या नावे
मायदेशात भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील सलग तिसऱ्या कसोटीत रूटने शतक झळकावण्याची कामगिरी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक आहे. यासह तो २०२१ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत खूप पुढे निघून गेला. रूटने यावर्षी आत्तापर्यंत ११ कसोटी सामन्यांच्या २१ डावांमध्ये ६९.९० च्या अविश्वसनीय सरासरीने १३९८ धावा केल्या असून, यामध्ये त्याने सहा शतके ठोकली आहेत. या सहापैकी द्विशतके होती.
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या भारताच्या रोहित शर्माच्या धावा या रूटपेक्षा जवळपास निम्म्याने कमी आहेत. रोहितने आतापर्यंत यावर्षी १० कसोटीच्या १८ डावांमध्ये ४४.३१ च्या सरासरीने ७०९ धावा जमवल्या असून, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या लाहिरू थिरीमन्ने याने ६५९ तर, चौथ्या क्रमांकावरील भारताच्या रिषभ पंतने ६४६ धावा जमवल्या आहेत.
एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा इंग्लिश कर्णधार
रूटने आपल्या अफलातून फॉर्मच्या जोरावर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या इंग्लिश कर्णधारांच्या यादीत पहिले स्थान पटकावले. त्याच्या नावे आता या वर्षात १३९८ धावा आहेत. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार ऍलिस्टर कूकच्या नावे होता. कूकने २०१५ मध्ये एका कॅलेंडर वर्षात १३६४ धावा करण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
हे पराक्रम पाहा आणि तुम्हीच ठरवा ‘रनमशीन’ कोण ते? विराट कोहली की जो रूट?
रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी






