भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. यॉर्कर किंग बुमराहची जादू प्रत्येक फॉरमॅटमध्ये दिसून येते. विशेषत: 2024 हे वर्ष या स्टार खेळाडूसाठी खूप चांगलं गेलं. आता जसप्रीत बुमराह यावर्षी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, 6 डिसेंबरपासून सुरू होईल. जसप्रीत बुमराहनं ॲडलेडमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात 3 विकेट घेतल्या तर तो माजी अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानचा एक मोठा विक्रम मोडेल.
जसप्रीत बुमराह या सामन्यात 1 बळी घेऊन एका कॅलेंडर वर्षात 50 कसोटी बळी पूर्ण करेल. तसेच 3 विकेट्स घेऊन तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत माजी भारतीय गोलंदाज झहीर खानला मागे टाकेल. झहीर खानच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात 51 कसोटी बळींचा विक्रम आहे, जो त्यानं 2002 मध्ये रचला होता. बुमराहनं या वर्षात 10 कसोटी सामने खेळले असून यात त्यानं आतापर्यंत 49 विकेट घेतल्या आहेत.
भारतासाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम माजी विश्वविजेते गोलंदाज कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देव यांनी 1983 मध्ये 75 विकेट घेतल्या होत्या. यानंतर कपिल देव आणि अनिल कुंबळे 74-74 विकेट्ससह यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विननं 2016 मध्ये 72 विकेट घेतल्या होत्या. तो या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. बुमराहची ही पहिलीच वेळ असेल जेव्हा तो एका वर्षात 50 कसोटी बळी पूर्ण करू शकतो.
पर्थ कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे विजयाचा हिरो बनला होता. त्या सामन्यात त्यानं पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियानं धूळ चारली, पहिल्या वनडेत भारतीय संघाचा दारुण पराभव
भुवीचं नाणं अजूनही खणखणीत वाजतंय! जबरदस्त हॅट्ट्रिकसह केली टीकाकारांची बोलती बंद
विनोद कांबळीच्या मदतीला आले वर्ल्ड कप विजेते स्टार, परंतु ही एक अट मान्य करावी लागेल!





