अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघांत मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने एका डाव व २५ धावांनी इंग्लंडला पराभूत केले आहे. यासह ३-१ ची आघाडी घेत यजमानांनी ही कसोटी मालिका खिशात घातली. या विजयाबरोबरच, विराट कोहलीने कर्णधार म्हणून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला.
कर्णधाराच्या या यादीत दुसर्या स्थानी आला विराट
इंग्लंडवरील विजयासोबतच विराट कोहलीने कर्णधाराच्या एका खास यादीत स्थान मिळवले. मायदेशात नेतृत्व करत पहिल्या तीस कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधाराच्या यादीमध्ये त्याने दुसरा क्रमांक पटकावला. विराटने आत्तापर्यंत मायदेशात ३० कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना २३ विजय मिळवून दिले आहेत.
या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग प्रथमस्थानी आहे. त्याने मायदेशात नेतृत्व केलेल्या पहिल्या तीस कसोटीमध्ये २४ सामन्यात संघाला विजयश्री मिळवून दिली होती. पॉंटिंग व विराटनंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा क्रमांक लागतो. त्याने, २१ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. इंग्लंडचा माजी कर्णधार ऍण्ड्रू स्ट्रॉस व दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांनी मायदेशात पहिल्या तीस कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व करताना अनुक्रमे १९ व १८ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला होता.
भारतीय संघाचा दणदणीत विजय
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतरही पुढील दोन कसोटीत विजय मिळवत भारतीय संघाने आघाडी घेतली होती. चौथ्या आणि अखेरच्या कसोटीतही भारतीय संघाने वर्चस्व गाजवत अवघ्या तीन दिवसात सामना आपल्या नावे केला.
अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी पाच मिळवत इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांवर गुंडाळत संघाला एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवून दिला. भारतीय डावात महत्त्वपूर्ण शतक ठोकणाऱ्या रिषभ पंतला सामनावीर तर संपूर्ण मालिकेत ३२ बळी मिळवणाऱ्या रविचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
एबी डिविलियर्सने केले विराटचे कौतुक; म्हणाला, ‘त्याच्या नेतृत्वाने युवा क्रिकेटपटूंना….’
धक्कादायक! माजी रणजीपटूला ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक
“वॉशिंग्टनचे शतक हुकल्याने फार वाईट वाटतंय”, भारताच्या माजी खेळाडूचे ट्विट