शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ६८वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. शुक्रवारी (दि. २० मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईला दीडशे धावांवर रोखले. यादरम्यान त्यांचा जबरदस्त फिरकीपटू युझवेंद्र चहलने खास कारनामा केला. त्याने केलेल्या विक्रमामुळे तो संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीला उतरला. यावेळी फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये जबरदस्त फटकेबाजी करणाऱ्या चेन्नईने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५० धावा चोपल्या. चेन्नईच्या ६ विकेट्सपैकी २ विकेट्स या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने घेतल्या. त्याने अंबाती रायुडूला ३ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर त्याने आपल्या संघाच्या धावसंख्येत भर घालू पाहणाऱ्या कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला २६ धावांवर बाद केले. विशेष म्हणजे, या दोन्ही खेळाडूंना चहलने झेलबाद केले.
यामुळे चहल २ विकेट्स घेताच आयपीएलच्या एका हंगामातील सर्वाधिक विकेट्स घेणारा संयुक्तरीत्या अव्वल फिरकी गोलंदाज बनला. त्याने आतापर्यंत आयपीएल २०२२मध्ये एकूण १४ सामने खेळताना ७.६७च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक २६ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे त्याने अव्वलस्थान काबीज केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या यादीत चहलसोबत अव्वलस्थानी इम्रान ताहिर आहे. ताहिरने २०१९च्या आयपीएल हंगामात २६ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी वनिंदू हसरंगा, सुनील नारायण आणि हरभजन सिंग यांचा क्रमांक लागतो. हसरंगाने आयपीएल २०२२मध्येच २४ विकेट्स, नारायणने आयपीएल २०१२मध्ये २४ विकेट्स आणि हरभजनने आयपीएल २०१३मध्ये २४ विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे फिरकी गोलंदाज
२६ विकेट्स- युझवेंद्र चहल (२०२२)*
२६ विकेट्स- इम्रान ताहिर (२०१९)
२४ विकेट्स- वनिंदू हसरंगा (२०२२)
२४ विकेट्स- सुनील नारायण (२०१२)
२४ विकेट्स- हरभजन सिंग (२०१३)