आयपीएल २०२० ची अखेर मंगळवारी झाली. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद मिळवले. याबरोबरच यंदाच्या आयपीएलचा पर्पल कॅप विजेता खेळाडू मिळाला आहे. आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप मिळते.
यंदाच्या आयपीएल हंगामातील पर्पल कॅपचा मानकरी दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ठरला आहे. त्याने १७ सामन्यात १८.६५ च्या सरासरीने २९ विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडाच्या पाठोपाठ मुंबईचा जसप्रीत बुमराह आहे. त्याने १५ सामन्यात २७ विकेट्स घेतल्या आहेत.
#आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
१. कागिसो रबाडा- ३० विकेट्स, १७ सामने (दिल्ली कॅपिटल्स) –
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने यंदाच्या हंगामात सातत्याने चांगली गोलंदाजी केली. त्याने अनेकदा त्याच्या गोलंदाजीच्या जीवावर दिल्लीला विजय मिळवून दिला. या हंगामात त्याने २ वेळा ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. त्याने या हंगामात १७ सामने खेळताना २९ विकेट्स घेतल्या. २४ धावात ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
२. जसप्रीत बुमराह- २७ विकेट्स, १५ सामने (मुंबई इंडियन्स)
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे यंदाच्या आयपीएल हंगामातही आपले वर्चस्व गाजवले. त्याने देखील २ वेळा ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला.१४ धावात ४ विकेट्स ही त्याचे सर्वात्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. त्याने या हंगामात १५ सामन्यात २७ विकेट्स घेतल्या.
३. ट्रेंट बोल्ट – २५ विकेट्स, १४ सामने (मुंबई इंडियन्स)
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने बुमराहला योग्य साथ देताना मुंबईच्या गोलंदाजीला धार आणली. त्याने पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेत मुंबईला सुरुवातीला मोठे यश बऱ्याचदा मिळवून दिले. या हंगामात त्याने १ वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरी करताना १५ सामन्यात एकूण २५ विकेट्स घेतल्या.
४ युजवेंद्र चहल – २१ विकेट्स, १५ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचीही फिरकी यंदा कमाल करुन गेली. त्याने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अनेक मोठ्या फलंदाजांना अडकवले. त्याने यंदाच्या आयपीएल हंगामात १५ सामने खेळताना एकूण २१ विकेट्स घेतल्या. यात त्याच्या १८ धावांत ३ विकेट्सच्या कामगिरीचा समावेश आहे.
५. राशिद खान – २० विकेट्स, १६ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा फिरकीपटू राशिद खानने नेहमीप्रमाणेच आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने मधल्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी करताना यंदा १६ सामन्यात २० विकेट्स घेतल्या. यात त्याच्या ७ धावांत ३ विकेट्सच्या कामगिरीचा समावेश आहे.