MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम 4 जूनपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता तिसऱ्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी आपण मागील दोन हंगामातील खेळाडूंच्या व संघाच्या कामगिरीचा मागोवा घेत आहोत. आज आपण एमपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी तीन गोलंदाजांविषयी जाणून घेऊया.
एमपीएलच्या पहिल्या दोन्ही हंगामात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघ प्ले ऑफ्समध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरलेला. त्यांच्या या दोन्ही यशात फिरकीपटू श्रेयस चव्हाण (Shreyas Chavan) याचा सिंहाचा वाटा राहिला. पहिल्या हंगामात खेळताना श्रेयसने आठ बळी मिळवले होते. मात्र, दुसऱ्या हंगामात त्याची कामगिरी अधिक उठावदार झाली. एमपीएल 2024 मध्ये 12 सामने खेळताना त्याच्या जादुई फिरकीने वीस फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दोन हंगामात मिळून 28 बळी घेत तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
महाराष्ट्र संघाचा अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav) हा पहिला हंगामात त्यावेळच्या सोलापूर रॉयल्स संघाचा भाग होता. दुखापतीमुळे झगडत असताना त्याला त्या हंगामात फक्त दोन बळी मिळवता आले होते. मात्र, दुसऱ्या हंगामात रत्नागिरी जेट्स संघाचा भाग झाल्यानंतर त्याने, आपण महाराष्ट्र संघाचे सर्वोत्तम गोलंदाज का आहोत, याचे प्रमाण दिले. त्याने आपल्या संघाला विजेता बनवताना 12 सामन्यात 25 बळी टिपले. तो दुसरा हंगामातील पर्पल कॅप विजेताही राहिला. यासह तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला.
पुणेरी बाप्पा संघ अद्याप एमपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. मात्र, संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज सचिन भोसले (Sachin Bhosale) याने दोन्ही हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली. पहिल्या हंगामात 14 बळी मिळवत त्याने पर्पल कॅप जिंकली होती. दुसऱ्या हंगामातही त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करताना 13 फलंदाज बाद केले. दोन हंगामात मिळून 27 बळी घेत, तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व एमपीएलचे मुख्य आयोजक आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, एमपीएल 2025 देखील आधीच्या दोन हंगामाप्रमाणे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत पाहता येणार आहे. यासोबतच पहिल्यांदा WMPL देखील आयोजित केली जातेय. मावळ तालुक्यातील गहुंजे येथे असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धा JioHotstar व Star Sports 2 येथे थेट प्रक्षेपित होणार आहेत. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)






