---Advertisement---

MPL 2025: ईगल नाशिक टायटन्सची नजर दुसऱ्या विजयावर, सातारा करणार का कमबॅक?

On: शनिवार, जून 7, 2025 9:11 AM
---Advertisement---

एमपीएल 2025 मध्ये शनिवारी (7 जून) सामन्यांचा ट्रिपल डोस मिळणार आहे. एकाच दिवशी तीन सत्रांमध्ये तीन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सातारा वॉरियर्स यांच्या दरम्यान होईल. ईगल नाशिक टायटन्स आपला सलग दुसरा विजय मिळवून, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर, सातारा वॉरियर्स आपला पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरतील.

ईगल नाशिक टायटन्सने उद्घाटनाच्या झालेल्या सामन्यात रत्नागिरी जेट्सवर दणदणीत विजय मिळवलेला. विजयासाठी 195 धावांचे आव्हान असतानाही मंदार भंडारी याने झळकावलेल्या वादळी शतकाच्या जोरावर त्यांनी केवळ दोन गडी गमावत आव्हान पार केलेले. तर, दुसऱ्या बाजूला सातारा वॉरियर्सला आपल्या पहिल्याच सामन्यात रायगड रॉयल्सकडून पराभूत व्हावे लागलेले. त्यामुळे विजय मिळवून गुणतालिकेत खाते खोलण्याचा सातारा संघाचा इरादा असेल.

ईगल नाशिक टायटन्स संघाची मदार पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजांवर असणार आहे. मंदार भंडारी, साहिल पारख, अर्शिन कुलकर्णी व अथर्व काळे हे फलंदाजीची बाजू भक्कम करतील. तर, गोलंदाजीत पुन्हा एकदा कर्णधार प्रशांत सोलंकी व मुकेश चौधरी जोर लावताना दिसतील. सातारा वॉरियर्सची फलंदाजी प्रामुख्याने पवन शहा, ओम भोसले व हर्षल काटे यांच्या अवतीभवती फिरेल. तर, गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर, वैभव दरकुंडे व विवेक शेलार हे नाशिक संघाला रोखण्याचा प्रयत्न करतील.

उभय संघांमध्ये होणारा हा सामना सकाळी 9 वाजता खेळला जाईल. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात 180 ही धावसंख्या विजयी धावसंख्या मानली जाऊ शकते. मात्र, सकाळच्या सत्रात पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन

ईगल नाशिक टायटन्स- मंदार भंडारी,‌ अर्शिन कुलकर्णी, रणजित निकम, साहिल पारख, अथर्व काळे, दिग्विजय देशमुख, रोहन दामले, योगेश डोंगरे, प्रशांत सोलंकी (कर्णधार), मुकेश चौधरी व मनोज इंगळे.
इम्पॅक्ट प्लेअर- अक्षय वायकर

सातारा वॉरियर्स- सौरभ नवले (कर्णधार), पवन शहा, ओम भोसले, मेहुल पटेल, हर्षल पटेल, अनिकेत पोरवाल, राजवर्धन हंगरगेकर, शमशुझमा काझी, विवेक शेलार, शुभम मैद व जगदीश झोपे.
इम्पॅक्ट प्लेअर- वैभव दरकुंडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---