---Advertisement---

MPL 2025: पावसातही नाशिकची झंझावात कामगिरी! साताऱ्यावर 8 विकेट्सनी दणदणीत विजय

---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) 2025 मध्ये आज झालेल्या पहिल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने सातारा वॉरियर्सवर DLS नियमानुसार 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. पावसामुळे दुसऱ्या डावात सामन्याचे स्वरूप बदलण्यात आले आणि नाशिकला 5 षटकांत 54 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.

प्रथम फलंदाजी करताना सातारा वॉरियर्सने 15 षटकांत 116 धावा केल्या. पवन शहाने 32 चेंडूंमध्ये 40 धावा करत चांगली सुरुवात करून दिली, तर ओम भोसलेने 20 चेंडूत 25 धावा करत त्याला साथ दिली. हर्षिल काटेने देखील 21 धावा केल्या. 15 षटकांपर्यंत संघाने 4 विकेट्स गमावून 116 धावा केल्या, यानंतर सामन्यात पावसाचे आगमन झाले. ज्यामुळे सातारा संघाला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाली नाही, परिणामी नाशिक टायटन्सला डीएलस नियमानुसार 5 षटकांत 54 धावांचे लक्ष्य मिळाले.

नाशिक टायटन्सकडून अक्षय वायकरने प्रभावी गोलंदाजी करत 3 षटकांत फक्त 13 धावा देत 2 बळी घेतले. प्रशांत सोलंकीला एक यश मिळाले.

दुसऱ्या डावात पावसामुळे सामना 5 षटकांवर आला. नाशिक टायटन्सने जोरदार सुरुवात करत फक्त 3.3 षटकांतच लक्ष्य गाठले. आर्शिन कुलकर्णीने आक्रमक 19 धावा (9 चेंडूत) केल्या, त्याने राजवर्धन हंगरगेकरच्या एका षटकात 22 धावा कुटल्या. तर साहिल पारखने नाबाद 9 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. साताऱ्याकडून वैभव दारकुंडे आणि विवेक शेलार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

या विजयासह ईगल नाशिक टायटन्सने हंगामातील दुसरा विजय नोंदवला असून, प्लेऑफच्या दिशेने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---