---Advertisement---

अर्धी MPL 2025 संपली! पाहा कोण आहे गुणतालिकेत कोणत्या स्थानी

On: शनिवार, जून 14, 2025 2:00 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम प्रचंड लोकप्रियतेत सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाने होत असलेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीतील अर्ध्याहून जास्त सामने खेळून झाले आहेत. शुक्रवारी (13 जून) झालेल्या तीन सामन्यानंतर गुणतालिकेची स्थिती कशी आहे, यावर आपण नजर टाकूया.

ईगल नाशिक टायटन्स संघाने आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक 6 सामने खेळले आहेत. नाशिक संघाने सलग चार सामने जिंकत प्ले ऑफ्सच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले होते. त्यानंतर रायगड रॉयल्सने त्यांचा पराभव केला. मात्र, या पराभवातून धडा घेत त्यांनी दुसऱ्याच दिवशी सातारा वॉरियर्सला मात देत पाचवा विजय साकार केला. पाच विजय झाल्याने आणि सद्यस्थितीत नेट रनरेट अधिक असल्याने ईगल नाशिक टायटन्स प्ले ऑफ्सच्या उंबरठ्यावर आहेत. आणखी एक विजय मिळवल्यास, त्यांच्या नावापुढे क्वालिफिकेशनचा क्यू लागेल.

रायगड रॉयल्स संघाला पहिल्या दोन हंगामात अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. तिसऱ्या हंगामाची सुरुवात त्यांनी विजयाने केली. मात्र, त्यानंतर सलग दोन सामन्यात त्यांना दारूण पराभव पत्करावे लागले. पुन्हा एकदा आधीच्या हंगामासारखी अवस्था रायगडची होईल अशी चर्चा सुरू होती. मात्र, ऋषभ राठोड याच्या नेतृत्वातील या संघाने दोन दिवसात दोन विजय मिळवत गुणतालिकेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंत पाच सामन्यात तीन विजय व दोन पराभव अशी त्यांची कामगिरी राहिली असली तरी, वजा नेट रनरेट त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

पहिल्या हंगामापासून मजबूत दिसणाऱ्या पुणेरी बाप्पा संघाने विजयाने सुरुवात केली. त्यांनी सलग दोन सामन्यात मोठे विजय नोंदवले. मात्र, या कामगिरीत त्यांना सातत्य राखता आले नाही. पुढील दोन सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले. तर, पीबीजी कोल्हापूर टस्कर्सविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यांचे आतापर्यंत पाच सामन्यात पाच गुण झाले असून, स्पर्धेतील सर्वोत्तम रनरेट त्यांची जमेची बाजू आहे.

एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामाचे विजेतेपद रत्नागिरी जेट्स संघाने पटकावले होते. तिसऱ्या हंगामात त्यांना हॅट्रिकची अपेक्षा होती. परंतु, त्यांची हंगामाची सुरुवात पराभवाच्या हॅट्रिकने झाली. सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुनरागमन केले. पुढील दोन सामने जिंकत त्यांनी चार गुणांची कमाई केली. त्यांचा सहावा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सध्या त्यांच्या खात्यात सहा सामन्यात पाच गुण असून, ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने पहिल्या दोन एमपीएल हंगामात सातत्य दाखवले होते. नव्या हंगामात देखील रत्नागिरीला पराभूत करत त्यांनी सुरुवात केली. मात्र, यानंतर त्यांच्या पदरी दोन मोठे पराभव पडले आहेत. तसेच सलग दोन सामने पावसामुळे वाया गेल्याने त्यांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. कोल्हापूरच्या नावावर आत्तापर्यंत पाच सामन्यांत एक विजय, दोन पराभव व दोन निकाल न लागलेले सामने, यांचे मिळून चार गुण आहेत.

प्रथमच एमपीएल खेळत असलेला सातारा वॉरियर्स संघ चमत्कार करण्यात आतापर्यंत पूर्णता अपयशी ठरला आहे. त्यांनी खेळलेल्या पाच सामन्यानंतर चार पराभव व एका विजयासह ते अखेरच्या म्हणजे सहाव्या क्रमांकावर उभे आहेत. प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करायचा असल्यास त्यांना आणखी किमान चार सामने जिंकावे लागतील. तसेच, रनरेट वाढवून इतर संघ कशी कामगिरी करतात, याकडे लक्ष द्यावे लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---