एमपीएल 2025 मध्ये शनिवारी (7 जून) सलग तीन सामने पाहायला मिळणार आहेत. सुट्टीचा दिवस असल्याने या सामन्यांसाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करू शकतात. दिवसातील तिसरा आणि अखेरचा सामना रायगड रॉयल्स विरुद्ध पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान होईल. दोन्ही संघ आपला सलग दुसरा विजय मिळवून, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रयत्न करतील.
पहिला दोन हंगामात तितकी उत्कृष्ट कामगिरी करू न शकलेल्या रायगड रॉयल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात सातारा वॉरियर्सवर दणदणीत विजय मिळवलेला. विजयासाठी 191 धावांचे आव्हान उभे केल्यानंतर गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत सातारा संघाला 166 धावांवर रोखण्याची कामगिरी केलेली. तर, दुसऱ्या बाजूला पुणेरी बाप्पा संघानेही गतविजेत्या रत्नागिरी जेट्सला पाच षटकांच्या सामन्यात 8 गड्यांनी मात दिली होती.
रायगड रॉयल संघाच्या फलंदाजीची जबाबदारी या सामन्यात देखील कर्णधार ऋषभ राठोड, युवा दिग्विजय पाटील व हर्ष मोगावीरा व ऋग्वेद मोरे यांच्या खांद्यावरच असेल. तर, गोलंदाजीत विकी ओस्तवाल हितेश वाळुंज व तनय संघवी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. पुणेरी बाप्पा संघासाठी यश नाहर, मुर्तझा ट्रंकवाला, साहिल औताडे व कर्णधार यश क्षीरसागर हे फलंदाजीत निर्णायक कामगिरी करू शकतात. तर, निकित धुमाळ, सचिन भोसले व रोशन वाघसरे हे गोलंदाज रायगड रॉयल्सला रोखण्यासाठी प्रयत्न करतील.
उभय संघांमध्ये होणारा हा सामना सायंकाळच्या सत्रात खेळला जाईल. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात 180 ते 190 दरम्यानची धावसंख्या विजयी धावसंख्या मानली जाऊ शकते.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रायगड रॉयल्स- सिद्धेश वीर, हर्ष मोगावीरा, दिग्विजय पाटील, ऋषभ राठोड, हर्ष संघवी, ऋग्वेद मोरे, अजय बोरुडे, तनय संघवी, हितेश वाळुंज, विकी ओस्तवाल व सागर जाधव
इम्पॅक्ट प्लेअर- निखिल कदम
पुणेरी बाप्पा- यश नाहर, मुर्तझा ट्रंकवाला, साहिल औताडे, यश क्षीरसागर, सुरज शिंदे, नौशाद शेख, रामकृष्ण घोष, ऋषिकेश सोनवणे, रोशन वाघसरे, निकित धुमाळ व सचिन भोसले
इम्पॅक्ट प्लेअर- रोहन खरात





