पुणे। जागतिक महिला दिनानिमित्त डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डेक्कन जिमखाना-पीएमडीटीए मानांकन महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात मृणाल शेळके हिने विजेतेपद संपादन केले, तर दुहेरीत खुल्या गटात श्रावणी देशमुख व रितिका मोरे या जोडीने विजेतेपद मिळवले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मृणाल शेळके हिने अंजली निंबाळकरचा 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. मृणाल ही महाराष्ट्र मंडळ इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून मॅस्ट्रो अकादमी, हिराबाग प्रशिक्षक प्रणव वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. जानेवारी महिन्यात एमडीटीए 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावले होते.
दुहेरीत अंतिम फेरीत श्रावणी देशमुख हिने रितिका मोरेच्या साथीत शांभवी नाडकर्णी व रितू ओक यांचा 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखानाच्या नियामक मंडळाचे सदस्य अभिजीत आपटे, क्लबच्या नियामक मंडळ माजी सदस्या आदिती आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, स्पर्धा निरीक्षक वेंकटेश आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: एकेरी: 14वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
मृणाल शेळके वि.वि.श्रावी देवरे 6-4;
अंजली निंबाळकर वि.वि.काव्या पाटील 6-0;
अंतिम फेरी: मृणाल शेळके वि.वि.अंजली निंबाळकर 6-2
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
रितिका मोरे/श्रावणी देशमुख वि.वि.भावना अगरवाल/स्नेहा स्वामी 6-3;
शांभवी नाडकर्णी/रितू ओक वि.वि.मृणाल शेळके/आरोही देशमुख 6-2;
अंतिम फेरी: श्रावणी देशमुख/रितिका मोरे वि.वि.शांभवी नाडकर्णी/रितू ओक 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
केरलाविरुद्ध शील्ड विजेते जमशेदपूर ‘हॉट फेवरिट’ आयएसएल सेमीफायनल १ फर्स्ट लेग