---Advertisement---

चपळ धोनीने केले तीन चेंडूत दोन स्टम्पिंग, पहा व्हिडिओ

On: गुरूवार, मे 2, 2019 6:51 PM
---Advertisement---

चेन्नई। बुधवारी(1 मे) आयपीएल 2019 मध्ये 50 वा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. साखळी फेरीत घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात 80 धावांनी मोठा विजय मिळवला.

या विजयात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात फलंदाजीत 22 चेंडूत 44 धावा करण्याबरोबरच यष्टीरक्षणातही चमक दाखवली. त्याने यष्टीरक्षण करताना चपळाईने 2 यष्टीचीत केले आणि 1 झेल घेतला. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

धोनीचे यष्टीचीत करण्याची शैली चांगलीच प्रसिद्ध आहे. तो काही सेंकदाच्या आत फलंदाजाला यष्टीचीत करतो. हीच गोष्ट या सामन्यातही पहायला मिळाली. त्याने काही सेकंदांचा अवधी घेत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला एकाच षटकात यष्टीचीत केले.

दिल्लीचा संघ चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 12 वे षटक रविंद्र जडेजाने टाकले. या षटकात चौथ्या चेंडूवर मॉरिसने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतू चेंडू धोनीच्या हातात गेला आणि धोनीनेही जलदगतीने स्टम्पवरील बेल्स उडवल्या.

यावेळी जेव्हा बेल्स उडाल्या तेव्हा मॉरिसचा अगदी काही सेकंदासाठी पाय थोडा जमीनीपासून वर हवेत होता. पण धोनीसाठी एवढेच पुरेसे होते. धोनीच्या या चतुराईमुळे मॉरिसला आपली विकेट सामन्यातील पहिलाच चेंडू खेळताना गमवावी लागली.

त्यानंतर याच षटकात 44 धावा करत दिल्लीकडून एकाकी झुंज देणाऱ्या अय्यरलाही धोनीने असेच बाद केले. अय्यर फटका खेळायला चुकला, त्यामुळे चेंडू थेट धोनीच्या हातात गेला. धोनी लगेचच बेल्स उडवल्या.

यावेळी जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा दिसले की धोनीने बेल्स उडवल्या त्यावेळी अय्यरचा पाय जमीनीपासून केवळ 1 सेंटीमीटर वर हवेत होता. त्यामुळे अय्यरला बाद देण्यात आले. अय्यरला यष्टीचीत करण्याचा वेळ नंतर दाखवण्यात आला. तो वेळ केवळ 16 सेकंदाचा होता.

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 179 धावा केल्या होत्या. त्यानंतर 180 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 16.2 षटकात 99 धावांवरच संपुष्टात आला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक…

सोशल मीडियावर अशी भावूक पोस्ट करत स्टिव्ह स्मिथने केले आयपीएल २०१९ला गुडबाय…

आयपीएल २०१९मध्ये हॅट्रिक घेणारा श्रेयस गोपाळ ठरला दुसरा गोलंदाज, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment