पंजाब किंग्जविरुद्ध महेंद्रसिंह धोनी शून्यावर बाद झाला असला तरी त्यानं या सामन्यात एक इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीनं यष्टिरक्षक म्हणून 150 झेल घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच यष्टिरक्षक ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकाही यष्टीरक्षकानं 150 झेल घेतलेले नाहीत. चेन्नई सुपर किंग्जच्या माजी कर्णधारानं वयाच्या 42 व्या वर्षी ही कामगिरी केली.
महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. आतापर्यंत आयपीएलच्या 261 सामन्यांमध्ये कॅप्टन कूलनं यष्टिरक्षक म्हणून 150 झेल घेतले आहेत. याशिवाय त्यानं 42 फलंदाजांना यष्टिचितही केलं आहे. अशाप्रकारे यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीनं एकूण 192 फलंदाजांना बाद केलंय.
या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकनं आतापर्यंत 245 आयपीएल सामन्यांमध्ये 141 झेल घेतले आहेत. याशिवाय त्यानं 36 फलंदाजांना यष्टिचीत केलं आहे. पंजाब किंग्जविरुद्ध महेंद्रसिंग धोनीनं सिमरजीत सिंगच्या चेंडूवर जितेश शर्माचा झेल घेतला. हा झेल घेताच त्यानं आयपीएलमध्ये आपले 150 झेल पूर्ण केले.
पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सॅम करनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 139 धावाच करता आल्या.
चेन्नई सुपर किंग्जकडून अष्टपैलू रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली. जडेजानं आधी फलंदाजीत सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना ३ बळीही घेतले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनाविराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याशिवाय चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंगनं 2-2 बळी घेतले. तर मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद, शिवम दुबेला झालं तरी काय?