इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. २६ मार्चपासून मुंबई, पुण्याच्या मैदानांवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी (२४ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने चेन्नई संघाचे नेतृत्त्वपद सोडले असून आता ही जबाबदारी अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्या हाती सोपवण्यात आली आहे. जडेजा हा संघासाठी महत्वाचा खेळाडू असला तरीही चेन्नई संघाच्या चाहत्यांना धोनी कर्णधारपदी नसणार, याबद्दल दुःख वाटत असणार, हे वेगळे सांगायला नको.
धोनी (MS Dhoni) आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी (Most Successful Captain) एक होता. त्याने त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघाला असाधारण यश मिळवून दिले आहे. चेन्नईचा कर्णधार (MS Dhoni Step Down As CSK Captaincy) म्हणून त्याच्या कामगिरीवर एक नजर (MS Dhoni Captaincy Record) टाकूया…
धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर २००८ पासून टी२० स्वरुपातील आयपीएल या लीगची सुरुवात झाली. या लीगमधील पहिल्याच हंगामात चेन्नई संघाच्या नेतृत्त्वाचा मुकूट धोनीच्या (CSK Captain) डोक्यावर सजला. या पहिल्यावहिल्या हंगामातच त्याने चेन्नई संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. मात्र राजस्थान रॉयल्सने त्यांच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेतला. त्यानंतर पुढील हंगामात (२००९) चेन्नई संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. परंतु त्यांना अंतिम सामन्यापर्यंत पोहोचता आले नव्हते.
२ हंगाम विजेतेपदाच्या नजीक पोहोचूनही अपयश पाहिल्यानंतर अखेर २०१० साली चेन्नई संघाने धोनीच्या कर्णधारपदाखाली आयपीएल ट्रॉफी उंचावली. त्याच्या पुढील हंगामातही धोनीने संघाला विजेता बनवले. त्यानंतर २०१२ आणि १३ या हंगामात चेन्नई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यापुढील हंगामात अर्थात आयपीएल २०१४ मध्ये चेन्नईने प्लेऑफपर्यंत मजल मारली.
२०१५ मध्ये त्यांना पुन्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याच हंगामात स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई संघावर २ वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे चेन्नईचा संघ २०१६ आणि २०१७ हंगामात आयपीएलच्या मैदानात उतरू शकला नव्हता. मात्र २०१८ मध्ये संघाने धूमधडाक्यात पुनरागमन केले आणि तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले.
त्यानंतर २०१९ मध्ये चेन्नई संघ उपविजेता राहिला. मात्र २०२० मध्ये संघाचे प्रदर्शन अतिशय सुमार राहिले. या हंगामात पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघाला प्लेऑफमध्येही पोहोचता आले नव्हते. उलट चेन्नई संघ साखळी फेरीतून सर्वातआधी बाहेर पडणारा संघ होता. मात्र या निराशाजनक प्रदर्शनावर पडदा टाकत धोनीने २०२१ मध्ये चौथ्यांदा चेन्नई संघाला आयपीएल चषक जिंकून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या उमरान मलिकला विराटने काय दिलेला सल्ला, वाचा
आनंदाची बातमी! आयपीएलचा थरार आता मराठीतूनही मिळणार अनुभवायला