पुणे। भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या एमएस धोनीच्या महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमीचे पुण्यात आगमन होत आहे. धोनी क्रिकेट अकादमी पुण्यातील अग्रगण्य क्रिकेट मास्टर्स अकादमीसोबत संलग्न झाली आहे. क्रिकेट मास्टर्स अकादमी आणि धोनी क्रिकेट अकादमी एकत्रितपणे पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच या अकादमीचे उद्घाटन जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती धोनी क्रिकेट अकादमीचे संचालक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेरिल कलीनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रणजी खेळाडू बाबूराव यादव, ओनेल नोह, सोहेल रौफ, क्रिकेट मास्टर्स अॅकेडमीचे गजेंद्र पवार आणि अनिल वाल्हेकर, उमेश पाथरकर, अमोल माने उपस्थित होते.
डेरील कलीनन म्हणाले, “सध्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटयुगात पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना जास्तीतजास्त आधुनिक पद्धतीचा सराव मिळावा आणि सोबतच क्रिकेटमधल्या नवनवीन पद्धतीचे सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे म्हणून क्रिकेट मास्टर्स अकादमी आणि एमएस धोनी क्रिकेट अकादमीच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.”
गजेंद्र पवार म्हणाले, “क्रिकेट मास्टर्स अकादमीची स्थापना २०१३ मध्ये क्रिकेटचा सर्वांगीण विकास हा मुख्य दृष्टीकोन समोर ठेऊन झाली. ५ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी क्रिकेटचे प्रशिक्षण येथे मिळते. एमएस धोनी क्रिकेट अकादमीशी संलग्न झाल्याचा आम्हाला आनंद झाला आहे.”
स्थानिक युवा गुणवान खेळाडूंना चांगल्या क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे, तसेच तांत्रिक आणि आधुनिक व्यायामाचे महत्त्व जाणून क्रिकेटमधला बदल स्थानिक खेळाडूंना अंगिकारता यावा यासाठी महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमीसोबत एकत्र येण्याच्या दृष्टीने क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीने हे पाउल उचलले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराटला उकसवू नका”; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिला सहकाऱ्यांना इशारा
भन्नाटच! ख्रिस लिनचा षटकार पाहून गोलंदाजही अवाक, दिली अशी प्रतिक्रिया; पाहा Video